Political Horoscope Sarkarnama
राजकीय भविष्य

Political Horoscope : भविष्यनामा : १४ ते २१ डिसेंबर नवीन सरकारचा कार्यकाळ कसा राहील?

Political Horoscope How will the new government tenure : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले असून ता. ५ डिसेंबर रोजी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन झाले आहे. आता १४ ते २१ डिसेंबर नवीन सरकारचा कार्यकाळ कसा राहील? हे वाचा

Rashmi Mane

सिद्धेश्वर मारटकर

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले असून ता. ५ डिसेंबर रोजी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन झाले आहे. या शपथविधीच्या पत्रिकेचा विचार करून नवीन सरकार कसे राहील याचा विचार करता येईल.

पाच डिसेंबर ५.३५ वा मुंबई येथे वृषभ या स्थिर लग्नावर सरकार स्थापन झाले असून, लग्नेश शुक्र भाग्य स्थानी, दशमेश शनी दशमात (कुंभ) स्वराशीत असून लग्नस्थानी गुरू व सप्तमात रवी या ग्रहस्थितीमुळे नवीन सरकार पूर्ण पाच वर्षांचा कालावधी निश्‍चितपणे पूर्ण करेल.

या पत्रिकेतील प्रमुख वैशिष्ट म्हणजे लग्न स्थानी गुरू (कर्क) उच्च नवमांशात असून रवी- चंद्रावर गुरूचा पूर्ण दृष्टी आहे. शपथविधी पाच डिसेंबर म्हणजे गुरुवारी झाला आहे. त्यामुळे हे सरकार गुरूच्या अमलाखालील महायुतीचे सरकार म्हणता येईल. गुरू या ग्रहाचा अंक तीन असून या सरकारमध्ये प्रमुख तीन पक्षांचा समावेश आहे (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस). तसेच शपथविधी सुद्धा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या तिघांचाच झाला आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फडणवीस हे राज्याचे २१ वे (२+१) मुख्यमंत्री आहेत.

यात पण तीन क्रमांक येत आहे. गुरूचा प्रभाव असल्यामुळे होणारे मंत्रिमंडळ ‘जंबो’ असणार आहे. गुरू हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह असल्याने व सोबत हर्षल असल्याने विक्रमी बहुमत महायुतीला मिळाले आहे. या काळात होणाऱ्या रवी-गुरू सम-सप्तक योगामुळे सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्ता मिळेल, असे भाकीत मागील लेखातून वर्तविण्यात आले होते. तोच योग या पत्रिकेत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला सरकार चालविण्यात मोठे यश मिळण्याची शक्यता राहील.

वृषभ स्त्री तत्त्वाचे लग्न असून लग्नेश शुक्र भाग्यस्थानी चंद्राबरोबर असल्यामुळे या मंत्रिमंडळात स्त्री मंत्र्यांची संख्या वाढलेली दिसेल. तसेच दशमातील स्वराशीतील शनीमुळे सरकार स्थिर व पूर्ण काळ टिकेल. या शनीमुळे ज्येष्ठांनासुद्धा पुन्हा संधी मिळेल. ज्येष्ठ अनुभवी मंत्र्यांची संख्या अधिक राहील. दशमातील शनीमुळे नवीन कायदे तयार होतील, नवीन आरक्षण लागू होईल.

शनीचे गोचर भ्रमण पाहता२०२७पर्यंत या मंत्रिमंडळात मोठे बदल होणार नाहीत. मात्र २०२८मध्ये मोठे बदल संभवतात. शेवटच्या दोन वर्षांत नवीन नेतृत्व लाभण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील. याचवेळी केंद्रातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील सरकारच्या फेरबदलासाठी केंद्रातील बदल कारणीभूत राहील.

दशमातील शनीमुळे या सरकारचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील उद्योगधंदे वाढविण्याचे असेल. उद्योग व रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. मात्र या पत्रिकेत राहू-नेप्चून योग लाभस्थानी होत असल्यामुळे या सरकारमध्ये मित्रपक्षांतील रुसवे-फुगवे, नाराजीनाट्य सातत्याने अनुभवास येतील. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावरून नाराजी उघड होईल.

पुढील काळात मंगळ वक्री होणार असून मार्चपर्यंत धनस्थानातील वक्री मंगळामुळे राज्याच्या तिजोरीवर अधिकच ताण पडण्याची शक्यता राहील. नवीन अर्थसंकल्पानंतर पुन्हा केंद्राच्या मदतीने आर्थिक अडचणीवर मात करण्यात यश मिळेल.

मे २०२५ नंतरचे गुरूचे धनस्थानातील भ्रमण राज्यासाठी विशेष अनुकूल असून, पुढील वर्षात राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल व वाढ होण्याची शक्यता असून आगामी काळात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकावर ठेवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होतील व त्यामध्ये सरकारला मोठे यश मिळेल. या निमित्ताने नवीन सरकारला हार्दिक शुभेच्छा!

साप्ताहिक राशिभविष्य

मेष : हा काळ मनस्तापाचा राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मात्र महत्त्वाच्या कामात स्त्री वर्गाचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : नोकरी/व्यवसायात विशेष कष्ट पडतील. नातेवाईकांशी मतभेद टाळावेत. तीर्थयात्रा, प्रवास होतील. एखाद्या स्त्री मुळे मोठी संधी मिळेल. प्रसिद्धी मिळेल.

मिथुन : स्पष्टवक्तेपणामुळे मोठे वादविवाद संभवतात. कमी श्रमात मोठा फायदा संभवतो. पैशांची कामे होतील.

कर्क : मानसिक त्रास संभवतो. प्रवास जपून करावेत. विवाह जमविण्यात यश मिळेल. जोडीदाराचे सौख्य लाभेल.

सिंह : विवाहसौख्यात मतभेद संभवतात. घर/वाहन यासाठी खर्च होतील. मात्र नोकरीत प्रमोशन मिळेल.

कन्या : मित्र परिवाराशी सुसंवाद ठेवावा. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळेल.

तूळ : मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणतणावाचा त्रास संभवतो. उंची वस्तू/वाहन यांची खरेदी होईल.

वृश्चिक : मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. महत्त्वाच्या कामात अडथळे आल्याने निराशा येईल. मात्र प्रवास, सहलीमधून आनंद मिळेल. मोठे मान सन्मान मिळतील.

धनू : प्रवासात काळजी घ्यावी लागेल. भावंडे/नातेवाइकांबरोबर मतभेद संभवतात. कौटुंबिक प्रॉपर्टी/वारसा हक्क यावरून कटकटी संभवतात.

मकर : नोकरी व्यवसायात मनासारखे यश मिळेल. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. मोठी गुंतवणूक कराल.

कुंभ : ज्वर/श्वसनाचे विकार संभवतात. मोठ्या प्रवासाची संधी मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठ्या पदाची प्राप्ती होईल.

मीन : अचानक मोठे लाभ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात/परीक्षेत अडथळे संभवतात. मोठे कर्ज मंजूर होईल. प्रसिद्धी नावलौकीक मिळेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT