सिद्धेश्वर मारटकर
Bhavishya : या कालावधीत १२ फेब्रुवारीच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून, षष्ट व्यय स्थानातून पौर्णिमा होत आहे. षष्टातील रवी-प्लुटो योगामुळे पाण्यात बुडून होणारे मृत्यू, जहाज किंवा विमान अपघातांतून मोठी जीवितहानी संभवते. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल.
मोठ्या पदावरील महिला किंवा महिला कलाकाराचा मृत्यू संभवतो. महाकुंभ स्थळी संगमस्थानापाशी मोठी दुर्घटना संभवते. शुक्र-नेपच्यून-राहू योगामुळे कलाकार किंवा चित्रपटाविरोधात आंदोलने होतील. दशमातील गुरू देशाची प्रतिष्ठा वाढविणारा असेल. खेळाडूंना मोठे यश मिळेल. कलाकारांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतील. डॉलरच्या विरोधात काही देश नवीन चलन व्यापारात उतरविण्याची शक्यता असेल.
शनी-बुध योगामुळे नवीन कायदे, नियम लागू होतील. कररचनेतील बदल सामान्यांना दिलासा देणारा राहील. संसदेत नवीन विधेयके संमत होतील. जुन्या कायद्यांत महत्त्वाचे बदल करण्यात येतील. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे अधिकार वाढतील. या काळात महत्त्वाच्या खटल्यांचे निकाल गाजतील. वक्री मंगळामुळे शेअरबाजारात मोठी तेजी येईल. अन्नधान्य, हॉटेल, बँक, औषधे, खनिज, पेट्रोल, गॅससह सोन्याचे भाव वाढतील.
या काळात शेजारील राष्ट्रांत स्फोटक घटना, हिंसा, जाळपोळ, युद्धासारखे प्रसंग संभवतात. रशिया चीनसारखे देश अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतील. आगीच्या दुर्घटना, अतिरेकी कारवायां अमेरिकेला धोका संभवतो. पाश्चिमात्य देशांना नैसर्गिक आपत्ती, युद्ध, दहशतवादी कारवायांना तोंड द्यावे लागेल. इंग्लड, कॅनडाला सावरण्याची संधी मिळेल.शुक्र-राहू-नेपच्यून योगामुळे मोठे आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येतील. ‘क्रिप्टो’सारख्या अभासी चलनातून मोठा भ्रष्ट्राचार होण्याची शक्यता असेल.
आगामी काळात रवी-शनी युती होत असून सत्ताधारी पक्ष, सरकारी अधिकारी, राजकीय व्यक्तींसाठी आगामी काळ कटकटीचा राहील. मोठ्या व्यक्तींवर मोठे आरोप होतील. मोठ्या पदावरील व्यक्तींचे निलंबन, बडतर्फीच्या घटना अनुभवास येतील. पुढील काळात मोठ्या धार्मिक व्यक्ती, राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींचे मृत्यू होण्याची शक्यता असेल.
साप्ताहिक राशिभविष्य :
मेष : सप्ताहाची सुरुवात धाडसी निर्णयाने कराल. शत्रूवर विजय, स्पर्धेत यश मिळेल. १२ फेब्रुवारीची पौर्णिमा चतुर्थात होत असल्याने घर-जागेसंबंधी कामे करावी लागतील. छोटे प्रवास जपून करावेत. भावंडे-नातलगांशी मतभेद टाळावेत. नोकरीत बढती किंवा बदली संभवते. उत्तरार्धात मुलांची चिंता राहील.
वृषभ : अनपेक्षित मोठे खर्च होतील. कुटुंबातील कलह टाळावा. स्पष्टवक्तेपणामुळे संबंध खराब होण्याची शक्यता राहील. जोडीदाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. १२ फेब्रुवारीची पौर्णिमा तृतीय स्थानात असल्याने सतत प्रवास होतील. लेखनाला प्रसिद्धी मिळेल. उत्तरार्धात घर किंवा जागेसंदर्भात व्यवहार होतील. वरिष्ठांकडून मोठी संधी उपलब्ध होईल.
मिथुन : सध्या मानसिक स्थिती खराब राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वादविवाद टाळावेत. १२ फेब्रुवारीची पौर्णिमा धनस्थानी होत आहे. वसुलीसाठी कटकटी होतील. घरातील ज्येष्ठांसाठी प्रतिकूल काळ राहील. प्रवास जपून करावेत. प्रवास करावे लागतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च करावा लागेल. वाहतुकीचे नियम न पाळल्याने दंड भरावा लागेल. राशीतील पौर्णिमा आरोग्यात सुधारणा करणारी आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात लाभ होईल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक नियोजन कराल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी इच्छा पूर्ण होईल. अडकलेले पैसै वसूल होतील. शत्रूवर विजय मिळेल. मोठे धाडसी निर्णय घ्याल. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. दूरचे प्रवास होतील. नोकरीत बढती मिळेल. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल. भागीदारी, कोर्ट-कचेरीमध्ये यश मिळेल.
कन्या : सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीमध्ये बदल किंवा बदलीचे प्रयत्न होतील. नोकरी-व्यवसायात जबाबदारी आणि कष्ट वाढतील. मात्र, वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. मोठा प्रवास होईल. संततीसाठी मोठा खर्च होईल. शेअरबाजारात मोठा लाभ होईल.
तूळ : सप्ताहाच्या सुरुवातीला देवदर्शन-तीर्थयात्रा होईल. दशमात होणारी पौर्णिमा नोकरीत अधिकार वाढविणारी आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत मोठ्या पदांवर संधी मिळेल. वरिष्ठांना खूश करण्यात यश मिळेल. उत्तरार्धात मोठे लाभ होतील. घर किंवा जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील.
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. हितशत्रूंचा उपद्रव संभवतो. भाग्यस्थानातून होणारी पौर्णिमा नवीन संधी देणारी राहील. नवीन व्यवहार-कागदपत्रांची कामे होतील. नातलग-भावंडांशी मतभेद टाळावेत.
धनू : सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोर्ट-कचेरीचे निकाल विरोधात जातील. मोठे खर्च होतील. अष्टमातील पौर्णिमा आरोग्य बिघडवणारी राहील. उत्तरार्धात पैशाची कामे होतील. नातलगांची मदत होईल. महत्त्वाची बातमी कळेल.
मकर : नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. घर-जागेच्या कामात अडथळे येण्याची शक्यता राहील. नातलगांशी दुरावा संभवतो. सप्तमात येणारी पौर्णिमा तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल राहील. कोर्ट-कचेरीमध्ये यश मिळेल. वारसा हक्क, विमा, पेन्शनसारख्या कामांतून यश मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची तक्रार राहील. डोळ्यांची काळजी घ्यावी.
कुंभ : मुलांची चिंता राहील. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. शेअरबाजारापासून दूर रहावे. तरुणांना प्रेमप्रकरणात मनस्ताप. षष्टातील पौर्णिमा नोकरीत बदल करणारी. परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न होतील. मानसिक स्थिती खराब राहील. जोडीदाराशी जुळवून घ्यावे. कोर्ट-कचेरीत मनासारखे निर्णय होतील. विद्यार्थ्यांनी आरोग्य सांभाळावे.
मीन : सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण गरम राहील. घर, वाहनदुरुस्तीसाठी खर्च होतील. मानसिक स्थिती खराब राहील. मात्र, पंचमात होणारी पौर्णिमा मोठे लाभ देणारी राहील. मुलांच्या समस्या सुटतील. सरकारी कामात यश मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची तक्रार राहील. कर्जाची कामे होतील. नोकरीत जबाबदारी वाढेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.