8th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वार्षिक वेतनवाढ दुप्पट करावी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि महागाई भत्त्याचा (DA) काही भाग मूळ वेतनात विलीन करावा, अशा महत्त्वाच्या मागण्या कर्मचारी संघटनेने केल्या आहेत.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) आठव्या वेतन आयोगाकडे विविध प्रस्ताव सादर केले असून, त्यांची अंमलबजावणी झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासह निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांमध्येही बदल होऊ शकतो.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या आधारे दरवर्षी ३ टक्के वेतनवाढ दिली जाते. मात्र, वाढती महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या आर्थिक गरजा लक्षात घेता ही वाढ ६ टक्क्यांपर्यंत करावी, अशी BPMS ची भूमिका आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य वाढ होण्यासाठी महागाईचा विचार करून फिटमेंट फॅक्टर निश्चित करावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
महागाई भत्त्याबाबतही संघटनेने महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. सध्याच्या महागाई भत्त्यापैकी ५० टक्के हिस्सा मूळ वेतनात आणि पेन्शनमध्ये विलीन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे नवीन फिटमेंट फॅक्टर लागू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा आधार वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, या प्रस्तावाला अद्याप सरकारची मंजुरी मिळालेली नाही.
निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा मुद्दाही कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) बंद करून पुन्हा जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना किमान ३० दिवसांचे वेतन आणि महागाई भत्त्याइतका बोनस देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या विमा सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीही BPMS ने केली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ग्रुप इन्शुरन्स स्कीम (CGEGIS) अंतर्गत सध्या असलेले ३० हजार रुपयांचे विमा संरक्षण वाढवून किमान १५ लाख रुपये करावे, अशी मागणी आहे. तसेच डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (DLI) अंतर्गत मिळणारा लाभ १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन रजेच्या नियमांमध्ये बदल सुचवण्यात आले आहेत. सध्या वर्षाला मिळणारी ८ दिवसांची कॅज्युअल रजा वाढवून १२ दिवस करावी, पितृत्व रजा ४५ दिवसांची करावी आणि चाइल्ड केअर लीव्हचा कालावधी दोन वर्षांपर्यंत वाढवावा, अशी मागणी आहे. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवसाची मासिक पाळी रजा देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या सर्व मागण्या भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने आठव्या वेतन आयोगासमोर मांडलेल्या प्रस्तावांचा भाग आहेत. त्यांना अद्याप आयोगाच्या अंतिम शिफारशी किंवा केंद्र सरकारचा अधिकृत निर्णय समजू नये. या प्रस्तावांवर विचार करून आयोग काय भूमिका घेतो आणि केंद्र सरकार त्याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.