Sillod News: आमच्या शिक्षिका आम्हाला खूप चांगल शिकवतात, त्यांची बदली करू नका, असे म्हणत हंबरडा फोडणारे विद्यार्थी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनता दरबारात दोन दिवसांपूर्वी धडकले. विद्यार्थ्यांचे हे अश्रू पाहून सत्तारही क्षणभर थबकले. जे शिक्षक चांगलं शिकवतात, त्यांना बदलून न शिकवणार्याला तिथे कशाला पाठवता? असा सवाल त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना केला होता.
तत्काळ संबंधित शिक्षिकेच्या बदलीचे आदेश रद्द करण्या संदर्भात प्रस्ताव तयार करा, अशा सूचना देत त्यांनी 'तुमच्या शिक्षकाची बदली होऊ देणार नाही, तेच शिक्षक तुम्हाला मिळतील, आता कोणीही रडू नका' असे म्हणत सत्तार यांनी या विद्यार्थ्यांना आश्वस्त केले होते.
एवढ्यावर न थांबता काल मुंबईत सत्तार यांनी हा विषय थेट शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या कानावर घातला. यावर भुसे यांनीही नियमाने बदली झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित शिक्षिकेला त्याच शाळेत प्रतिनियुक्ती देण्या संदर्भात निर्णय घेऊ, असा शब्द सत्तार यांना दिला.
सिल्लोड, तालुक्यातील मोढा खुर्द येथील विद्यार्थ्यांनी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या जनता दरबारात जाऊन भेट घेतली होती. शाळेतील शिक्षिका सिरसाट यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी रडतच सत्तार यांच्याकडे आम्हाला याच शिक्षिका हव्या आहेत, त्या आम्हाला चांगल शिकवता, असे सांगत त्यांची बदली करू नका, अशी हात जोडत विनंती केली.
विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन अब्दुल सत्तार यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षिकेची बदली रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. विभागाकडून हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे जाण्याआधीच सत्तार यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नावे पत्र तयार करून मुंबईत त्यांची भेट घेतली.
मंत्री भुसे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, शिक्षिका सिरसाट यांची बदली नियमानुसार झाली असल्यास प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून त्यांना मोढा खुर्द येथेच सेवा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संबंधित शिक्षिकेचा मोढा खुर्द येथेच सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन याप्रकरणी लक्ष देऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.