Hepatitis deaths in Maharashtra : अकोले तालुक्यातील राजूर येथे गेल्या काही दिवसांपासून काविळीच्या आजाराने थैमान घातलं आहे. या आजाराने सुरुवातीला 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, आता 13 वर्षीय मिसबाह शेख या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राजूरकर संतप्त झाले असून, त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांवर रोष व्यक्त केला.
आतापर्यंत कावीळग्रस्त रुग्णांची संख्या 350 च्यावर पोचली आहे. काल आणखी एक मुलीचा मृत्यू झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत संतोष बनसोडे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. आमदार डाॅ. किरण लहामटे परिस्थितीवर लक्ष ठेवून असले, तरी आरोग्य विभागाला वाढत्या रुग्णसंख्यसमोर काही सुचेनासे झाले आहे.
श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी मिसबाह शेख हिचा काविळीनं मृत्यू झाल्याची बातमी मिळताच शाळेतील शिक्षक (Teacher) व विद्यार्थ्यांना रडू कोसळले. मिसबाह हिच्या नातेवाईक या दुःखातून अजून सावरलेले नाहीत. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने राजूर गावात मागील काही दिवसांपासून काविळीचे रुग्ण वाढले आहेत.
आरोग्य विभागाने गावात भेट देऊन घरोघरी जाऊन माहिती घेत असले, तरी साथ आटोक्यात येण्यासाठी करत असलेले प्रयत्न अपुरे ठरत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनीही गावाला भेट देऊन अनेक सूचना केल्या. आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate), माजी आमदार वैभव पिचड आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही भेट देऊन आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले.
काविळीने काही दिवसांपूर्वीच 20 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. माजी आमदार वैभव पिचड यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत चौकशी केली. आरोग्याधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना केल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे, म्हणून ग्रामस्थांनी मोर्चाही काढत शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यातच काविळीनं दुसरा बळी घेतला. यामुळे नागरिक आता संतप्त झाले आहेत.
या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपसरपंच संतोष बनसोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, आता सरपंच काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे. अद्यापही काही रुग्णांची तब्येत अत्यवस्थ असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची पुणे येथून आलेल्या शास्त्रज्ञांचे राजुरमध्ये दाखल झाले आहे. या तज्ज्ञांनी गावातील पाणी व सांडपाण्याचे नमुने घेतले अशून, विषाणू संसर्गाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागोजी चव्हाण यांनी गावात भेट देत, आरोग्य केंद्र, जलस्त्रोत आणि बाधित भागांची पाहणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.