Lohit Matani IPS Sarkarnama
प्रशासन

Bhandara SP's Initiative : वर्दीत गुंडांना पळता भुई थोडी करतो, अन् केबिनबाहेर लोकांच्या डोक्यावर हात ठेवतो…

अभिजीत घोरमारे

Bhandara IPS News : भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली आहे. त्यांपैकी काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाची छाप पाडली. भंडाऱ्यात कार्यरत असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी हेदेखील आपले धडाकेबाज निर्णय आणि भूमिकांच्या अंमलबजावणीने भंडाराकरांच्या मनावर राज करीत आहेत. (Amazing story of IPS Lohit Matani)

मतानी यांचे ‘पब्लिक पोलिसिंग’ जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबत मतानी यांनी पोलिस कुटुंबांचे पितृत्वदेखील स्वीकारले. २०१४च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी लोहित मतानी यांनी जुलै २०२२ मध्ये भंडारा पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी ते नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढावा, यासाठी त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. त्याचा परिणामही आता भंडारा जिल्ह्यात दिसतो आहे. पोलिस कुटुंबातील तरुणाईला ते स्वत: मार्गदर्शन करतात.

पोलिस कुटुंबांसाठी अनेक कौशल्य योजना भंडाऱ्यात सुरू झाल्या. महिलांसाठी स्वयंरोजगाराचे मार्ग त्यांनी प्रशस्त केला. त्यामुळं आता पोलिस कुटुंबातील महिला कापडी पिशव्या, फिनाईल, सॅनिटाइजर, अगरबत्ती आदींची निर्मिती करू लागल्या आहेत.

या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण पोलिस कुटुंबातील महिलांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये घेतले. भंडारा जिल्ह्यात पोलिसांच्या पाल्याचे ‘युथ फोरम’ स्थापन झाले. त्यातून त्यांना रोजगार विषयक मार्गदर्शन उपलब्ध होते आहे.

तरुणाईसाठी शहापूर येथे ‘कर्मशिला प्रकल्प’ सुरू झाला. कमी शुल्कात यूपीएससीएमपीएससीचे मार्गदर्शन आता भंडाऱ्यात मिळू लागलेय. पोलिसांना मानसिक तणावापासून मुक्त ठेवण्यासाठी ‘डिझास्टर क्लब’ आणि ‘अॅडव्हेंचर थीम’ भंडाऱ्यात सुरू झाली.

भंडारा पोलिसांनी यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा केला. त्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली. भंडारा जिल्ह्यातील पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांची जीवनशैली सध्या अशा उपक्रमांमुळे बदलली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे पाल्य व कुटुंबीय वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग घेत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील सुसंवादही वाढला आहे.

भंडारा पोलिसांनी आता पोलिस ठाण्यांच्या सीमा ओलांडत नागरिकांशी संवाद सुरू केलाय. सायबर क्राईम, ज्येष्ठांना मदत, आपत्कालीन व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सध्या विदर्भात भंडारा पोलिस अव्वल ठरले आहेत.

भंडारा पोलिस दलाचे कार्य इतर जिल्ह्यांतील पोलिस दलांनी अनुकरण करून राबवावे, असेच आहेत. यासाठी लोहित मतानी यांचा पुढाकार, त्यांच्या सहकारी अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांची त्यांना मिळणारी साथ व तरुणाईचा जोश अशा सर्वंकष बाबींचा समावेश आहे.

लोहित मतानी हे सायबर क्राइममध्ये पीएचडी करीत आहेत. गोबरवाही येथील नईम शेख हत्याकांडात त्यांनी याच सायबर शिक्षणाचा उपयोग करीत चक्क तीन तासांत १२ आरोपींना हुडकून काढले होते.

विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे. अनेक गुन्ह्यांत समाविष्ट असलेल्या आरोपीला त्यांनी सरळ सरळ एमपीडीए कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT