Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस कोसळल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने पुढाकार घेतला आहे.
येत्या काळात उद्भवणारी स्थिती तसेच जीर्ण इमारती, दरडप्रवण क्षेत्र आणि सखल भागात पाणी साचणे या प्रसंगांमध्ये सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज रहावे. बचाव आणि मदत कार्य पोहोचवतांना आपसामध्ये योग्य समन्वय राखावा, या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने पुढाकार घेतला आहे.
यामध्ये दोन दिवसीय कार्यक्रम आखून, संबंधित यंत्रणांना एकत्र आणून विविध ठिकाणी स्थळ पाहणी (रेकी) करण्यात येत आहे. मुंबईतील 105 ठिकाणांपैकी 31 मे 2024 काही ठिकाणी रेकी करण्यात आली. तर शनिवार 1 जून 2024 रोजी देखील उर्वरित ठिकाणी रेकी करण्यात येणार आहे.
यामध्ये भारतीय लष्कर (आर्मी), भारतीय नौदल (नेव्ही), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) चे जवान, बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, महानगरपालिका विभाग कार्यालय (वॉर्ड) आदींचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
पावसाळ्यात संभाव्य आपत्ती उद्भवल्यास आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहचविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरुप आणि तात्काळ सुटका कशी करता येईल, हा पाहणी करण्यामागचा उद्देश आहे.
मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात गत आठवड्यात 23 मे 2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती.
त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी पावसाळापूर्व तयारीसाठी समन्वय राखला जात असल्याची माहिती महानगरपालिकेचे संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी दिली . बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे, अंधेरी, मुलुंड, बोरिवली, मालाड आदी परिसरांमध्ये पाहणी करण्यात आल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
मुंबईतील चिंचोळ्या व घनदाट वस्तीच्या भागात मदतकार्य पोहोचवितांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवण्यासाठीचे जवळचे आणि सुटसुटीत मार्ग कोणते, मदत कार्यासाठी वाहनांचे मार्ग कसे निवडायचे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणेची सज्जता आदींची चाचपणी देखील या पाहणीतून करण्यात आली.