Iqbal Singh Chahal Sarkarnma
प्रशासन

Iqbal Singh Chahal Transfer : ठाकरेंनी आणलेल्या, शिंदेंनी गोंजारलेल्या चहलांना थेट इलेक्शन कमिशनचा दणका

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : मुंबई महापालिकेची प्रशासकीय ताकद शाबूत ठेवण्यासाठी खास ठाकरेंच्या मर्जीतून आयुक्त झालेले, ठाकरे सरकार पडल्यानंतरही शिंदे-फडणवीसांचे 'मन' सांभाळून आयुक्तपदावर कायम राहिलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना अखेर निवडणूक आयोगानेच पदावरून काढले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानेच चहलांना हटवल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला धक्का मानला जात आहे.

चहलांना आपल्या बाजूने फिरवून या सरकारने ठाकरेंच्या जुन्या योजना मोडून काढल्या आणि मुंबईकरांसाठी सरकारचा अजेंडा राबविण्याचा धडाका लावला होता. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या बजेटमध्येही चहलांनी शिंदे सरकारचाच गवगवा केल्याचेही दिसून आले आहे. चहल यांच्यासोबत शिंदेंच्या वाशिलेबाजीतून नेमलेल्या मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनाही निवडणूक आयोगाने इंगा दाखवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इकबालसिंह चहल हे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आहेत. मुंबई महापालिकेत त्यांची येत्या 31 मे 2024 रोजी चार वर्षे पूर्ण होणार होती. दरम्यान, राज्य सरकारने 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या निकषातून मुंबई पालिका आणि अतिरिक्त आयुक्तांना वगळण्याची विनंती केली होती. मात्र, ती विनंती अमान्य करत निवडणूक आयोगाने चहलांची तडकाफडकी उचलबांगली केली आहे. आता चहलांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या बदलीबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यातच तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. मात्र, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचा निवडणूक प्रक्रियेत थेट सहभाग नसतो. त्यामुळे या आदेशातून त्यांच्या बदल्या वगळण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. सरकारची ती विनंती मात्र आयोगाने फेटाळली मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांच्या बदलीचा आदेशच काढला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT