Jitendra Awhad sarkarnama
प्रशासन

म्हाडाच्या परीक्षेआधी दलालांना कळकळीचं आवाहन करीत आव्हाड म्हणाले...

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदांची (mhada exam 2021) भरती प्रक्रिया सुरु आहे. म्हाडाच्या परीक्षा उद्यापासून (ता.12) सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे आल्या आहेत. गरीबांचे शाप घेऊ नका, कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत, असे कळकळीचे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.

आव्हाड म्हणाले की, म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत.

माझी या दलालांना नम्र विनंती आहे की, हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचं काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हांला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

म्हाडाच्या परीक्षेबाबत राज्यात अफवा पसरविल्या जात आहेत. असा गैरप्रकार करणाऱ्याला कोणी पकडून दिले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पास झालेल्यांची दुसरी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आपण दिलेले पैसे वाया जातील, असेही आव्हाड यांनी काल (ता.10) बजावले होते.

म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT