Kolhapur Bribe Case :  Sarkarnama
प्रशासन

Kolhapur ACB Trap : एसीबीचा दणका! भूमी अभिलेख अधीक्षकांना दहा हजारांची लाच घेताना अटक

Kolhapur Bribe Case : निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी दहा हजारांची लाच घेतली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News: सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना वर्ग-1 चे अधिकारी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक आणि पाच हजारांची लाच घेताना चालक आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. जुना बुधवार पेठेतील अधीक्षक जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयात आज दुपारी ही कारवाई केल्याची माहिती 'एसीबी'चे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

भूमी अधीक्षक सुदाम दादाराव जाधव आणि वाहनचालक उदय लगमाना शेळके यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांच्या नावे लागली होती. ही शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या अन्य सहा हिस्सेदारांच्या नावे करायची होती. त्यासाठी पुणे येथील उपसंचालक भूमी अभिलेख या प्रादेशिक कार्यालयाकडे 2018 मध्ये अर्ज केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तक्रारदार यांच्या या प्रलंबित अर्जाची सुनावणी बुधवार पेठेतील भूमी अभिलेख अधीक्षक यांच्यासमक्ष सुरू करण्याचे आदेश उपसंचालक यांनी दिले आहेत. या सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मध्यस्थी करून साहेबांचे दहा आणि स्वतःचे पाच हजार द्यावे लागतील, असे वाहनचालक शेळके याने सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने एसीबीच्या शनिवार पेठेतील कार्यालयात तक्रार दिली होती. काल दुपारी बुधवार पेठेतील जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयात 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

तेथे लाचखोर जाधव यांनी दहा हजार स्वीकारले, तर वाहनचालकाने कार्यालयाच्या दारात पाच हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केल्याची माहितीही नाळे यांनी दिली. पोलिस निरीक्षक बापू साळुंके पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील आणि सुधीर पाटील, कॉन्स्टेबल सूरज अपराध, चालक विष्णू गुरव आदींनी ही कारवाई केली.

जाधवच्या घराची झडती

सुदाम जाधव यांनी शनिवार पेठेतील भूमी अभिलेख कार्यालयात यापूर्वी काम केले आहे. त्याच कार्यालयाच्या इमारतीत आज एसीबीच्या कार्यालयात त्यांना अटक करून आणण्यात आली. पोलिसांनी जाधव यांच्या नागाळा पार्क, धाराशिव येथील घरी, तर शेळकेच्या कणेरीवाडी येथील घराची झडती घेतल्याचे नाळे यांनी सांगितले.

वर्षात सहा ‘वर्ग 1’ अधिकारी जाळ्यात

एसीबीच्या उपअधीक्षकपदी सरदार नाळे यांनी जानेवारी 2023 मध्ये पदभार स्वीकारला. वर्षभरात त्यांच्याकडून एकूण 24 ठिकाणी छापे टाकून 42 आरोपींवर कारवाई केली. त्यामध्ये सहा आरोपी ‘वर्ग 1,’ सहा आरोपी ‘वर्ग 2’ आहेत. तसेच 12 तृतीय श्रेणी कर्मचारी असून, उर्वरित अशासकीय असल्याची माहिती एसीबीच्या कार्यालयातून देण्यात आली.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT