Tukaram Mundhe, Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचे थेट मंत्रालयात पडसाद; पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्याला दणका

Fake disability certificate Maharashtra : दिव्यांगत्वाचे अयोग्य प्रमाणपत्र दिल्याचे समोर आल्याने मंत्रालयातील एका सहायक कक्ष अधिकाऱ्याची पदोन्नती रद्द करण्यात आली आहे.

Rajanand More

Maharashtra Government news : दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असताना IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांविरोधा मोहीम हाती घेतली होती. राज्यभरातील सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालयांमधील दिव्यांग प्रवर्गातून नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तपासणी मुंढे यांनी सुरू केली होती. त्यातून अनेकांना दणका बसला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचा दणका आता मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. सामान्य प्रशासन विभागाने एका सहायक कक्ष अधिकाऱ्याची पदोन्नती रद्द केली आहे. ना. रा. दोडके असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की, सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीच्या सन २०२३-२४ च्या तदर्थ निवडसूचीत दिव्यांग प्रवर्गातून पात्र ठरल्याने ना. रा. दोडके यांना दि. ७ मार्च २०२४ च्या आदेशान्वये सहायक कक्ष अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यांची पदस्थापना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात करण्यात आली होती.

दोडके यांना ज्या प्रमाणपत्रावर दिव्यांगत्वाचे लाभ देण्यात आले आहे, ते प्रमाणपत्र अयोग्य असल्याचे संबंधित प्राधिकरणाने कळविले आहे. त्यामुळे ना. रा. दोडके यांना दि. ७ मार्च २०२४ च्या आदेशान्वये दिव्यांग प्रवर्गातून देण्यात आलेली सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नती रद्द करण्यात येत आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखकांची दि. १ जानेवारी २०२३ रोजीची सामाईक अंतरिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या ज्येष्ठतासूचीत दोडके यांच्या नावासमोरील रकान्यात अस्थिव्यंगता अशी नोंद घेण्यात आलेली आहे. दोडके यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अयोग्य असल्याने १ मार्च २०२४ रोजीचे आदेश करण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT