Pune News, 22 Apr : ग्रामीण भागात रक्ताच्या नात्यांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून होणारे वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आता वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी अवघ्या १०० रुपयांत होणार आहेत. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील नावे वेगळी करण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि कायदेशीर कटकटीतून सामान्य शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे.
आतापर्यंत कुटुंबातील भाऊ-बहीण किंवा वारसदारांना आपापसात जमीन वाटून घ्यायची असल्यास मुद्रांक शुल्कासोबतच 'नोंदणी शुल्क' भरावे लागत होते. हे शुल्क जमिनीच्या किमतीनुसार १ टक्का किंवा कमाल ३० हजार रुपयांपर्यंत जात असे. ही मोठी रक्कम भरण्यापेक्षा अनेक शेतकरी नोंदणी टाळत होते, ज्यामुळे पुढे जाऊन कुटुंबात वादाचे पेच निर्माण होत होते. आता सरकारने हे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. म्हणजेच, आता फक्त १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर जमीन वाटणीचे काम फत्ते होणार आहे.
रक्ताच्या नात्यातील भाऊ-बहिणींना आपली हिस्सा वेगळा करणे सोपे होईल. तसेच संयुक्त कुटुंबातील सदस्यांना आपले सातबारा स्वतंत्र करता येतील. ज्यांना हजारो रुपये फी भरणे परवडत नव्हते, अशा गरीब शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार आहे. पूर्वी नोंदणी शुल्क महाग असल्याने अनेकजण केवळ तोंडी वाटणी करून गप्प बसत होते.
मात्र, सातबारा उताऱ्यावर नावे वेगळी न झाल्याने जमीन विक्री करणे, बँकेकडून कर्ज घेणे किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळवणे कठीण जात असे. आता ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार असल्याने शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडे आता दोन पर्याय आहेत एक शेतकरी थेट तहसीलदारांकडे अर्ज करून जमीन वाटणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तर दुसरे स्वतःचे वाटणीपत्र तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.