Baramati By Election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची मंगळवारी (ता.२२) सांगता सभा बारामतीत पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे राज्यभरातील सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या सभेसाठी उपस्थित होत्या. या सांगता सभेत सुनेत्रा पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. कारण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत पहिल्यांदाच अशी मोठी राजकीय सभा पार पडत होती.
शिवाय अजितदादांची पत्नी स्वत: या निवडणुकीसाठी उभी असल्यामुळे त्या दादांच्या अपघाता संदर्भात काही बोलणार का याची देखील अनेकांना उत्सुकता लागली होती. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या भाषणात अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मोठं भाष्य केलं.
त्यांनी बारामतीकरांसमोर भरसभेत बोलताना अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका असल्याचं मोठं वक्तव्य केलं. शिवाय मनात शंका असल्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी, असं सांगितल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
तर अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं, असंही त्या म्हणाल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील व्यासपीठावर उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनीही भाष्य केलं. अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
तर या भाषणातून सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. त्या म्हणाल्या, "अजितदादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या विचाराचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी खचणार नाही. मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे.
ही माती माझी आहे, त्यामुळे दादांप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. दादांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाईन", असं आश्वासन त्यांनी बारामतीकरांना दिला. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.