MPSC Sarkarnama
प्रशासन

MPSC Recruitment : MPSC कडून विद्यार्थ्यांची थट्टा; अनेक जागा रिक्त असताना केवळ 87 पदांसाठी जाहिरात

MPSC state service recruitment post cut : एमपीएससी राज्यसेवा जाहिरातीत केवळ 87 जागा जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

Rashmi Mane

राज्यसेवेच्या भरती प्रक्रियेबाबत यंदा जाहीर झालेल्या जाहिरातीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी 2026 साठी केवळ 87 जागांचीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतानाही सरकारने इतक्या कमी जागा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.

मागील वर्षी राज्यसेवेच्या 127 जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र यंदा त्यात लक्षणीय घट करत केवळ 79 राज्यसेवेच्या आणि आठ पशुवैद्यकीय सेवेच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या जाहिरातीत राज्यसेवेतील तब्बल 35 संवर्गांपैकी फक्त चार संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस उपअधीक्षक यांसारखी महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांच्या प्रमुख लक्ष्य असलेली पदे यंदाही वगळण्यात आली आहेत.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. आयोगाने 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र इतक्या कमी जागा पाहून विद्यार्थ्यांनी सरकार आणि आयोगाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात हजारो पदे रिक्त असल्याचे प्रशासनच मान्य करत असताना जाहिरातीत मात्र हात आखडता का घेतला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे.

यंदाच्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी पदासाठी एकही जागा नसल्याने परीक्षेत प्रथम येणाऱ्या उमेदवारालाही हे पद मिळणार नाही. यापूर्वी २०२० मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्रथम क्रमांक मिळवूनही अपेक्षित पद न मिळाल्यास एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विवेक जाधव या विद्यार्थ्याने सांगितले की, कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण सहन करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर ही जाहिरात पाणी फेरणारी आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली असून, राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 316 अंतर्गत ही नियुक्ती केली आहे. भीमनवार सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत अध्यक्षपदावर राहणार आहेत. तोपर्यंत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT