पोलिस भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांना पुण्यात मात्र उंचीच्या निकषावर अपात्र ठरवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ससूनसारख्या शासकीय रुग्णालयाकडून दिलेले उंचीचे प्रमाणपत्रदेखील ग्राह्य धरले गेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेतील मोजमाप पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्याच्या गृह विभागामार्फत यंदा 16800 पदांसाठी पोलिस भरती सुरू आहे. या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 16 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहर पोलिस भरतीसाठीच जवळपास 185000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 11 फेब्रुवारीपासून विविध जिल्ह्यांत मैदानी चाचण्या सुरू झाल्या असून पुण्यात 16 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात मुलींची, तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 येथे मुलांची चाचणी घेतली जात आहे.
मात्र, उंची मोजण्याच्या प्रक्रियेत विसंगती आढळल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. काही मुली मुंबईत उंचीच्या निकषात पात्र ठरल्या होत्या, परंतु पुण्यात त्याच मुलींना अपात्र घोषित करण्यात आले. एकाच उमेदवाराचे दोन शहरांत वेगवेगळे मोजमाप कसे येऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात अनेक उमेदवारांनी ससूनसारख्या शासकीय रुग्णालयातून उंचीचे प्रमाणपत्र मिळवून ते सादर केले. तरीदेखील ते प्रमाणपत्र मान्य करण्यात आले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 'शासकीय रुग्णालयाचे मोजमाप योग्य की पोलिसांचे?' असा संतप्त सवाल उमेदवार विचारत आहेत.
काही विद्यार्थिनींच्या मते, अवघ्या 11 महिन्यांपूर्वी झालेल्या कारागृह पोलिस भरती प्रक्रियेत त्या उंचीच्या निकषात पात्र ठरल्या होत्या. त्यावेळीही पुणे शहर पोलिसांकडूनच शारीरिक मोजमाप घेण्यात आले होते. मग आता त्याच उमेदवारांना अपात्र का ठरवले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. “11 महिन्यांत उंची कमी झाली का?” असा उपरोधिक सवालही एका विद्यार्थिनीने केला. गेल्या वर्षी पात्र आणि यावर्षी अपात्र, ही बाब अन्यायकारक असल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पुणे शहर पोलिस प्रशासनाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी उंची मोजणी मॅन्युअल पद्धतीने केली जात होती. ससून रुग्णालयातही मॅन्युअल पद्धतीनेच मोजमाप होते. मात्र, यंदापासून पुण्यात डिजिटल आणि शास्त्रीय पद्धतीने उंची मोजली जात आहे. त्यामुळे डिजिटल प्रणालीद्वारे नोंदवलेले मोजमापच अंतिम मानले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी तातडीने हस्तक्षेप करून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमानता राखली गेली तरच विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, असे मत व्यक्त केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.