Police Station Sarkarnama
प्रशासन

Video Recording in Police Station: पोलीस ठाण्यात 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' गुन्हा आहे का? पोलीस आयुक्तांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

Video Recording in Police Station : रस्त्यावरही पोलिसांच्या कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता

सरकारनामा ब्यूरो

People Can Video Record in Police Station : तक्रार देण्यास गेल्यास पोलीस ठाण्यातील कर्मचारी तासनतास बसवून ठेवतात. काहीही कारणं सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात, अशा सामान्य नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलिसांकडून विनाकारण धमकावणे, लाचेची मागणी होत असल्याचेही बोलले जाते.

दरम्यान, याबाबत कुणी 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करत असेल त्यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. 'रेकॉर्डिंग' करण्यास मज्जाव केला जातो. 'रेकॉर्डिंग' करतो म्हणून पोलीस फोनही जप्त करतात. मात्र पारदर्शकतेसाठी कुणीही 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करू शकते, असे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पोलीस ठाणे हे गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही. त्‍यामुळे पोलीस ठाण्यात केलेले 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' गुन्‍हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. असे असतानाही पोलिसांकडून मात्र 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. याबाबत अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कान टोचले आहेत. याबाबत त्यांचा व्हिडिओ 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' होत आहे.

अमितेश कुमार म्हणाले, "पोलीस ठाणे सार्वजनिक ठिकण आहे. पोलीस कर्मचारी हे नागरिकांचे सेवक आहेत. त्यामुळे ते कर्तव्य बजावत असताना 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करतना कोणत्याही प्रकारची बंदी नाही. कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी कुणीही व्हिडिओ रेकॉर्डिंग 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करू शकतात. कुणी 'रेकॉर्डिंग' करतो म्हणून कर्मचारी संबंधितांवर कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्याशी उद्धवपणे वागणे, धमकावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. याबाबत पोलिसांना यापूर्वीही स्पष्ट सूचना देण्यात आली होती. यापुढेही त्यांनी तसे करू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे."

पोलीस ठाणेच नाही तर रस्त्यावर, जिथे कुठे पोलिसांच्या कामाबाबत संशय येईल तेथे कुणीही 'रेकॉर्डिंग' करू शकते. अमितेश कुमार म्हणाले, "पोलीस कर्मचारी रस्त्यावर कारवाई करत असतील. त्यावेळी कुणाला जर त्यांच्या कामाबाबत संशय आला तर कुणीही त्यांचा काम करताना व्हिडिओ करू शकतात. याबाबतही सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती दिलेली आहे."

यावेळी कुमार यांनी महिला कर्मचाऱ्यांबाबत काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. अमितेश कुमार म्हणाले, "व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना फक्त महिला कर्मचाऱ्यांची मानहानी होणार नाही, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा, पोलीस ठाण्यात, रस्त्यावर कर्मचारी काम करताना कुणीही 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करू शकतात. त्याला पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून आक्षेप घेता कामा नये, अशी स्पष्ट सूचना त्यांना दिलेली आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT