Kolhapur : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरून ते ईडीच्या रडारवर आहेत. तसेच ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. तर याचवेळी त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतानाच आपण कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोल्हापूर येथील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रम पत्रिकेवरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माजी कामगार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीऐवजी फोटो अपेक्षित असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झळकल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गडहिंग्लजमध्ये 'राज्य सरकार' आणि हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीनं येत्या 28 जून रोजी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची पत्रिका मात्र चांगलीच व्हायरल झाली आहे. या पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार वगळता महाविकास आघाडीच्या इतर कोणत्याही अन्य नेत्यांचा फोटो झळकलेला नाही. यामुळे कोल्हापूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले..?
गडहिंग्लज येथील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोटो झळकला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'शासन आपल्या दारी'मधील बहुतांशी योजनांचा जन्म मी मंत्री असताना घातला आहे. सरकार या योजना सरकारपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवत होतं. ही योजना कशी राबवली जाते हे राज्याला दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.
पण शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे मी आधीपासून सांगत आलो आहे. राष्ट्रवादी पक्षामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. महाविकास आघाडीचा यात सवाल नाही असंही स्पष्ट मत मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली म्हणून त्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी म्हणून शरद पवार आणि अजित पवारां(Ajit Pawar)चे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.