Pune Porsche Car Accident: Sarkarnama
प्रशासन

Porsche Car Accident Update : 'पोर्श कार' अपघात प्रकरणातील खटले 'फास्टट्रॅक' कोर्टात चालवण्याची पुणे पोलिसांची तयारी

Pune Police News : कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने आलेल्या पोर्श कारने एका दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

Chaitanya Machale

Pune News : कल्याणीनगर भागात दोन महिन्यापूर्वी झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाचे आरोपपत्र पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात कोर्टात दाखल केले आहे. या अपघात प्रकरणातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालयात ) चालवण्यात यावेत, अशी मागणी कोर्टात करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने आलेल्या पोर्श कारने एका दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही पोर्श कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित असल्याचे समोर आले होते.

बार आणि पब मध्ये पार्टी करून मोठ्या प्रमाणात मद्यपान करून अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितले होते. या अपघातानंतर गाडी चालवणाऱ्या या तरुणाला बाहेर काढून नागरिकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

पोलिस (Police) स्टेशनमध्ये गेल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगा कोण आहे, हे स्पष्ट झाले. हा अल्पवयीन मुलगा बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आले. हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते.

त्यावेळी 300 शब्दांचा निबंध लिहिणे तसेच पंधरा दिवस वाहतूक सुरक्षितेविषयी जनजागृती करणे अशा किरकोळ अटींवर या मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस तसेच न्याय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते.

या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुणे पोलिसांनी फेर अर्ज करून इतर कलमे लावून जामिनाच्या अर्जावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवस बालसुधार ठेवण्याचे आदेश बाल न्यायमंडळाने दिले होते.

दरम्यानच्या काळात या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ससून रुग्णालयात या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. यामध्ये त्याची आई वडील यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ससून मधील दोन डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह इतरांवर देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

या अपघात प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने 900 पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये 50 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. तसेच रस्त्यावरील पब, बार मधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, असे महत्त्वपूर्ण पुरावे या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत. आता हे खटले जलद गतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

या अपघात प्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पहिला गुन्हा हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाचे आई, वडील, आजोबा यांच्यासह ससून मधील डॉक्टर, कर्मचारी, या अल्पवयीन मुलाला दारू दिलेले पबचे मालक, मॅनेजर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT