PMC - Khadak Police  Sarkarnama
प्रशासन

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याने भाजप कार्यकर्त्याला दाखविले पिस्तुल

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे महानगरपालिकेतील एका कनिष्ठ अभियंत्याने चक्क ठेकेदार असलेल्या भाजपच्या एका कार्यकर्त्याला पिस्तुल दाखवून धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पुण्यात भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन सुरू असतानाच रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

महापालिकेतील मलनिस्सारण विभागातील कामाचा ठेका मिळविण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महापालिकेत (PMC) चांगलीच खळबळ उडाली असून ठेका मिळविण्यासाठी आता पालिकेतील अधिकारीच पिस्तुल दाखवून धमकावित असतील तर या अधिकाऱ्यावर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

या प्रकरणी निर्मल मोतीलाल हरिहर यांनी तक्रार दिली आहे. यावरून खडक पोलिसांनी पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. गणेश राजेंद्र गिते, महेश राजेंद्र गिते (रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार निर्मल हरिहर हे भाजपचे (BJP) कार्यकर्ते असून ते पालिकेचे ठेकेदार आहेत. रविवारी बालेवाडी येथे भाजपचे अधिवेशन होते. त्यासाठी ते रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीसाठी चालले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ ते थांबले होते. त्यावेळी पालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारे गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश गिते तेथे आले.

या दोघांनी हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या पोटाला पिस्तुल लावत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर हरिहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये काही राजकीय लागेबांधे असण्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT