Pmc Rajendra Bhosle Sarkarnama
प्रशासन

Pune Municipal Corporation News : पोलिस आयुक्तांनंतर आता पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर ; रुफटॉप हॉटेलवर कारवाई सुरू !

Chaitanya Machale

Pune News : शहरातील विविध भागातील इमारतींवरील टेरेसवर सर्रासपणे बेकायदा हॉटेल सुरू असल्याचे समोर आले आहे. बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या या रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्याचा निर्णय आता पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहरातील अशा नऊ हॉटेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 52 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

शहराची उपनगरे अशी ओळख असलेल्या बाणेर, बालेवाडी, औंध, कात्रज या भागासह कल्याणीनगर, वडगावशेरी, या भागातील अनेक इमारतींवर रूफ टॉप हॉटेल्स तयार करण्यात आली आहे. पुणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही हॉटेल्स उभारण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त मिळत असल्याने अनेकदा कारवाई करण्यास पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी औंध भागात असलेल्या एका रूफ टॉप हॉटेलला आग लागली होती. त्यानंतर हा विषय चर्चेत आला होता. काही हॉटेल्सवर कारवाई करत महापालिका प्रशासनाने ती बंद केली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा सुरू केली जातात. काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने 97 हॉटेल्सवर कारवाई केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी कल्याणीनगर भागातील एका पब समोर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन अभियंत्यांना उडविल्याचा प्रकार घडला. यामध्ये या दोन्ही अभियंता तरूण-तरूणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस दलातही चांगलीच खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन देखील मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या (Police) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत.

या प्रकारानंतर आता पुणे महापालिका (PMC) प्रशासन देखील सतर्क झाले आहे. शहरातील पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. कल्याणीनगर भागातील ज्या बॉलर पबसमोर हा अपघात झाला, त्या पबची पाहणी करण्यासाठी देखील महापालिकेने पथक पाठविले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 89 अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सपैकी 76 हॉटेलांना पालिकेच्या वतीने नोटिस देण्यात आली होती. त्यापैकी 53 हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सहा हॉटेल चालकांनी आपले बेकायदा बांधकाम काढून घेतले आहे. तर ज्यांनी अद्यापही आपले बेकायदा बांधकाम काढले नाही, अशा नऊ हॉटेलवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. यापुढील काळातही ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत पालिका आयुक्त भोसले यांनी दिले आहे.

अशी असतात रूफ टॉप हॉटेल्स

इमारतींच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड्स उभे करून ही हॉटेल सुरू केली जाता. यामुळे रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. रात्री उशीरापर्यंत ही हॉटेल सुरू राहत असल्याने आजुबाजुच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. पार्किंग, ध्वनीप्रदुषण होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येतात. याची दखल घेत पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. वारंवार कारवाई करून देखील ही हॉटेल्स दबाव आणून पुन्हा सुरू केली जात असल्याचे समोर आल्याने आता पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र पाठविण्याची तयारी पालिकेने सुरू केल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT