Satara District Hospital under scrutiny after dead body mix-up incidents, leading to suspension of district surgeon Dr. Yuvraj Karpe over alleged negligence. Sarkarnama
प्रशासन

Civil Hospital Satara : साताऱ्यात मृतदेहांसोबत धक्कादायक प्रकार; सिव्हिल सर्जन डॉ. युवराज करपेंचे तडकाफडकी निलंबन

Satara Civil Hospital dead body controversy : सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Hrishikesh Nalagune

Dr Yuvraj Karpe suspended from Satara Civil Hospital: महिन्याभरात दुसऱ्यांदा मृतदेह अदलाबदली प्रकरण घडल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय सातारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. शिवाय डॉ. करपे यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश मस्कू खोमणे (वय ५१, रा. आरळे, ता. सातारा) व आनंद सुनील ओव्हाळ (वय २६, रा. आंबेडकरनगर, सोनगिरवाडी, वाई) या दोघांचा मंगळवारी विषारी औषध पिल्याने मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयातील शवागारामध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यामुळे मृतदेह तेथेच ठेवण्यात आले होते. सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती.

सकाळी आरळे येथील नातेवाईक खोमणे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले. त्यावेळी शवागृहात दोन मृतदेह होते. पोलिसांनी मृतदेहाच्या कागदपत्रांची पूर्तता केली. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरेश खोमणे असे नाव असलेला मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृतदेहाचा चेहरा पांढऱ्या कापडाने गुंडाळलेला होता. नातेवाइकांनी तो मृतदेह आरळे येथे नेला.

Dr. Yuvraj Karpe suspension order

आरळे गावातील स्मशानभूमीत हिंदू धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. विधीनुसार मृतदेहाच्या पायावर पाणी घालणे आदी विधी पार पडले. त्यानंतर मृतदेहाला अग्नीही देण्यात आला. दरम्यान, आनंद ओव्हाळ यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात मृतदेह नेण्यासाठी आले होते.

तेही शवागारात असलेला मृतदेह घेऊन गेले. वाई येथे नेल्यानंतर नातेवाइकांनी चेहऱ्यावरील कापड काढले. तेव्हा तो मृतदेह आनंद यांचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सुरेश खोमणे यांचा मृतदेह परत जिल्हा रुग्णालयात आणला.

आमच्या मुलाचा मृतदेह ताब्यात द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला. पोलिसांनी खोमणे यांच्या नातेवाइकांना फोन केला. तेव्हा त्यांनी नेलेला आनंदचा मृतदेह अर्धवट जळत होता.

तुम्ही नेलेला मृतदेह सुरेश यांचा नसल्याचे पोलिसांनी नातेवाइकांना सांगितले. तो सोनगीरवाडी येथील आनंद ओव्हाळ यांचा असल्याचे सांगण्यात आले, तसेच सुरेश खोमणे यांचा मृतदेह अद्याप जिल्हा रुग्णालयात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही गोष्ट समजल्यावर पोलिसांनी आरळे येथील स्मशानभूमीत सुरू असलेले अंत्यसंस्कार लगेचच थांबवण्याचे निर्देश नातेवाइकांना दिले. त्यामुळे स्मशानभूमीतही गोंधळ उडाला. आरळे येथील ग्रामस्थांनी नदीतून पाणी आणून अर्धवट जळालेला मृतदेह विझवला.

पोलिसांनी मृतदेह आहे तिथे ठेवा, असे निर्देश दिले होते. त्यामुळे अंत्यसंस्काराला आलेल्या सर्वांना ताटकळत राहावे लागले. इकडे जिल्हा रुग्णालयात आनंद यांच्या नातेवाइकांचा गोंधळ सुरू होता. त्यांची समजूत काढेपर्यंत पाच-सहा तास गेले.

अखेर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुरेश यांच्या नातेवाइकांना जिल्हा रुग्णालयातील मृतदेह ताब्यात देण्यात आला, तर आनंदाचा मृतदेह चितेवर ठेवला असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्याच्या नातेवाइकांनी घेतला.

त्यामुळे आरळे येथेच दोघांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. या प्रकारामुळे संतप्त खोमणे कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालय व पोलिस प्रशासनाच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

जिल्हा रुग्णालयातील दोघे निलंबित :

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी या प्रकरणाची तातडीने प्राथमिक तपासणी केली. चौकशीनंतर निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांनी शंकर शिंदे व विशाल रावखंडे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश तातडीने दिले.

पण नियमानुसार जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देत असतात. नातेवाइकांना ताबा पावती पोलिसांकडून दिली जाते. नातेवाइकांना मृतदेह दाखवून त्यांनी ताबा दिला पाहिजे होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT