Sameer Wankhede and Rajesh Narvekar 

 

Sarkarnama

प्रशासन

वानखेडे अडचणीत; ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवळला कारवाईचा फास

समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) रडारवर आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) रडारवर आले आहेत. मुंबईत वानखेडे यांचा एक रेस्ट्रो बार आहे. वानखेडे यांनी 17 वर्षांचे असताना या बारचा परवाना घेतला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार आता ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्याही आहेत. राऊत यांची कन्या हिचा विवाह नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत झाला होता. या विवाहाची खूप चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता योगायोगाने वानखेडेंवर कारवाई करण्याची जबाबदारीही नार्वेकर यांच्यावर आली आहे. वानखेडे यांनी सतराव्या वर्षी बार परवाना घेतल्याने या बारला जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. आता वानखेडेंना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली असून, यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार आम्ही कारवाईची पावले उचलली आहेत. आम्ही कागदपत्रांची तपासणी केली असती वानखेडेंनी खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यांचे वय कमी असतानाही त्यांनी कागदोपत्री ते प्रौढ असल्याचे दाखवले होते. त्यावेळी प्रत्यक्षात त्यांचे वय 17 वर्षे होते.

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रेस्ट्रो बार आहे. समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये सद्गुरू रेस्ट्रो बार सुरू करण्यात आला. त्याचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांच्या नावाने घेण्यात आला. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखेडे यांच्या नावावर आहे. बारचा परवाना मिळवण्यासाठी वयाची अट 21 वर्षे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे हे नेमके कसे घडले याविषयी विचारणा केली होती.

उत्पादन शुल्क विभागाची प्राथमिक चौकशी संपली असून, या प्रकरणी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, वानखेडे यांनी 17 व्या वर्षी बारचा परवाना मिळवला. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार कारवाई होऊ शकते. त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. यासाठी वानखेडे यांनी परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केली हे सिद्ध करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT