Maharashtra administrative reshuffle : नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आता महापालिका निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या धामधुमीतच प्रशासनात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी चर्चांना उधाण आले आहे.
या बदल्यांमध्ये ठाणे जिल्ह्याच्या कन्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबतच वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. आणि 2023 बॅचचे IAS अधिकारी अरुण एम. यांचीही बदली करण्यात आली आहे. डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील आयटीडीपी प्रकल्पाची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात हा प्रकल्प राबवताना त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मंत्रालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. यांची वित्त मंत्रालयातील वित्तीय सुधारणा विभागातून नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विकास आराखड्यांमध्ये आणि आर्थिक नियोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मंत्रालयातील कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच 2023 च्या बॅचचे IAS अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रशासकीय अनुभव घेण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या जिल्ह्यातील विकासकामे, कायदा-सुव्यवस्था आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यामध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरेल.
याआधी 18 नोव्हेंबर रोजीही राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता दहावी आणि बारावी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते पुण्यातील यशदा या प्रशिक्षण संस्थेत उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासह राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या चार IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.
एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्यातील प्रशासन अधिक सक्रिय झाले असून, आगामी काळात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.