Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या बदलींनंतर पुणे महापालिका आयुक्तांच्या बदलीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अखेर विक्रम कुमार यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी (ता.15) पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांची मुंबईच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे, तर राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेले पावणेचार वर्षे ते महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत होते. गुरुवारी त्यांनी महापालिकेचे सभागृह बरखास्त झाल्यानंतर प्रशासक म्हणून दोन वर्षे पूर्ण केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या बदलीची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र, इतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघत असताना पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
महापालिकेचे 2024- 25 या वर्षासाठीचे बजेट सादर करण्यापूर्वी पालिका आयुक्त यांची बदली केली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, राज्यकर्त्यांशी जुळवून घेण्याची भूमिका विक्रम कुमार यांनी ठेवल्याने ही बदली लांबली होती. गेल्या आठवड्यात महापालिकेचे साडेअकरा हजार कोटींचे बजेटदेखील विक्रम कुमार यांनी सादर केले आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांची बदली करण्यात आली होती. देशमुख यांची बदली राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचीही बदली करण्यात आली होती. त्यांना राज्य होमगार्डचे महासमादेशकपदी बढती देण्यात आली होती. त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.