dhol tasha pathak
dhol tasha pathak Sarkarnama
पुणे

धक्कादायक : पुण्याच्या ढोल-ताशा पथकातील ६० जणांना हैदराबादमध्ये डांबून ठेवले

सरकारनामा ब्यूरो

लोणी काळभोर (जि. पुणे) : वादनासाठी हैदराबाद येथे गेलेल्या पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तब्बल ६० तरुण-तरुणींना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हा प्रकार समोर येताच पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे व सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी यांनी हैदराबादमधील नगरसेविकेशी संपर्क साधत त्यांच्या व पोलिसांच्या मदतीने तरुणांची सुखरूप सुटका केली. हे पथक रात्री पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. (60 members of Pune's Dhol-Tasha squad were detained in Hyderabad)

पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक ता. १६ सप्टेंबर रोजी सिकंदराबाद येथे वादनासाठी गेले होते. प्रेमचंद यादव यांच्याकडून ही सुपारी पथकाला मिळाली होती. चार दिवसांचे अडीच लाख रुपये ठरले होते. पथकात १५ मुली व इतर मुले होते. चार दिवस पथकाने विविध गावांत वादन केले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पैसे मागितले. परंतु, त्यांनी विनंती करून आणखी २ दिवस वादन करायला भाग पाडले. त्यानुसार पथकाने २२ सप्टेंबरपर्यंत वादन केले. परंतु, २३ सप्टेंबर रोजी हे पथक परत निघाल्यावर त्यांना पैसे न देताच त्यांच्या वाहनांची कागदपत्रे काढून घेण्यात आली. तसेच आणखी २ दिवस वादन करा, असे म्हणत वाद घातला.

या वेळी प्रेमचंद यादव व इतरांनी या मुलांना आम्ही जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पथकातील मुले आणि मुली घाबरून गेली. शेवटी या पथकाने शनिवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी व मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ठोंबरे व परदेशी यांनी तत्काळ हालचाली करत सिकंदराबाद येथील स्थानिक नगरसेविका बसेरिया पुजारी यांच्याशी संपर्क साधला. तसेच, पोलिसांनादेखील याची माहिती दिली. त्यानंतर सिकंदराबाद पोलिस व नगरसेविका पुजारी यांनी तेथे धाव घेतली. या मुलांशी संवाद साधून त्यांची सुटका केली. त्यांना पोलिस ठाण्यात आणत त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला बोलावून त्याच्याकडून तडजोड करत पैसे घेऊन दिले. त्यानंतर या मुलांना रात्री सुखरूप पुण्याकडे रवाना केले आहे.

या बाबत पथकाचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ म्हणाले की, राज्यातील पथके बाहेर जाऊन वादन करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. ढोल-ताशा पथक कला देशभर पसरवत आहे. परंतु, आज हा अत्यंत वाईट अनुभव आला आहे. आम्हाला २ लाख रुपये कमी दिले आहेत. यामध्ये प्रचंड मनस्‍ताप झाला आहे. या सर्व प्रकरणात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पोलिस यांनी खूप मदत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT