AAP News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad News : ''लोकांच्या कराचा पैसा आमदार विकत घेऊन सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रात वापरला गेला''

सरकारनामा ब्यूरो

AAP News : २८ मे रोजी पंढरपूरहून रायगड किल्याकडे निघालेली आम आदमी पार्टीची राज्यव्यापी स्वराज्य यात्रा काल (ता.३) पिंपरी चिंचवडमध्ये आली. या वेळी झालेल्या सभेत लोकांच्या कराचा पैसा आमदार विकत घेणे आणि सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रात वापरला गेला, असा हल्लाबोल करण्यात आला.

महाराष्ट्रात विकास कामांसाठी पैसा नसतो. मात्र, मतदान विकत घेण्यासाठी तो असतो, असा टोला आप' (AAP) चे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी या यात्रेच्या स्वागत सभेत लगावला. ५० कोटी घेऊन महाराष्ट्रात सत्तांतर होते, जनतेने निवडून दिलेले सरकार पैशाच्या जोरावर पाडले जाते, अशी तोफ त्यांनी डागली. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवरही त्यांनी टीकेचे आसूड ओढले. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कल्याणकारी योजना, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा, गरिबांच्या घरांसाठी पैसे नसतात.

मात्र, निवडणुका आल्यावर त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष करोडो रुपये घेऊन मतदान विकत घेण्यासाठी येतात, अशी कोपरखळी त्यांनी या सभेत मारली. शिवरायांच्या स्वप्नातील रयतेचा विचार महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पार्टी विधानसभा, महापालिका निवडणुकीत उतरणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

२८ मे ते ६ जून असा या यात्रेचा कालावधी आहे. तिचे पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) स्वागत यशवंत कांबळे यांनी सांगवी येथे केले. उपाध्यक्ष संतोष इंगळे यांनी दुपारी संत तुकारामनगरला पदयात्रा, तर महिला अध्यक्षा सीता केंद्रे यांनी जाधववाडी येथे रॅली काढून यात्रेचे स्वागत केले. आकुर्डीत रात्री सभा झाली. गत पाच वर्षाच्या भाजपच्या (BJP) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता काळातील कारभाराची `कॅग` मार्फत चौकशीची मागणी आपचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी यावेळी केली.

शिक्षणाचा बाजार आणि आरोग्याचे खाजगीकरण थांबवणे हा आपचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आपचे नेते विजय कुंभार, धनंजय शिंदे, धनराज वंजारी, संदीप देसाई, मुकुंद किर्दत, अजिंक्य शिंदे, संदीप सोनवणे, अजित फाटक आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT