Pune University Flyover Sarkarnama
पुणे

Pune Flyover: फडणवीसांनी उद्धघाटन केलेल्या 'अजित पवार उड्डाणपुला'च्या कामात मोठी त्रुट? भाजप नगरसेवकाने केला फोटो शेअर

Ganeshkhind Baner Pashan Road :पुण्यातील गणेशखिंड रोडवरील आचार्य आनंद ऋषिजी चौक उड्डाणपूलाच्या कामात त्रुटी असल्याचा आरोप भाजप नगरसेवक सनी निम्हण यांनी केला. वाचा सविस्तर बातमी.

Mangesh Mahale

Pune News, 10 March 2026: गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन झाले. या पुलाच्या कामात त्रुटी असल्याचा आरोप नगरसेवक सनी निम्हण यांनी केला आहे. पुलाच्या 'फ्लो' (कामातील त्रुटी) वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी या पुलाचा फोटो शेअर करीत "फ्लायओव्हर आहे कि फ्लॉओव्हर?" असे म्हणत कामाच्या दर्जावर टीका केली आहे.

" पुलाचे वास्तव दाखवणारा हा फोटो. ज्यांची ओळख 'परफेक्शनिस्ट' अशी होती आणि प्रत्येक कामात बारकाईने लक्ष घालून ते काम फ्लॉ लेस करण्याकडे ज्यांचा भर असायचा त्या स्व.अजितदादा पवार यांचे नाव या उड्डाणपूलाला देण्यात येणार आहे हा आता केवढा विरोधाभास आहे," अशी खंत निम्हण यांनी व्यक्त केली आहे.

पुढच्या २५-५० वर्षांचा विचार करता या चौकातील वाहतूक कोंडीमुक्त होण्यासाठी हा डबल डेकर फ्लायओव्हर साकारण्याचा निर्णय झाला. त्यात असे स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ठेऊन घाईघाईने उदघाटन करण्याचा घाट कशासाठी? इतक्या महत्वाच्या आणि महाकाय प्रकल्पाचे काम करताना पीएमआरडीए प्रशासन असे काम करत असेल तर बाकी छोट्या मोठ्या प्रकल्पांचे काय होत असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष

ज्या पुलावरून रोज हजारो वाहने धावणार आहेत तिथे असे ब्लँडर्स करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार पीएमआरडीएला कुणी दिला? माझे शिक्षण सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये झाले असल्याने याचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता आणि तांत्रिक चुकांकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष करण्याचे धाडस पीएमआरडीएनी केले आहे हे मला सहज उमजते. सामान्य माणसाने पण पुलाचा हा भाग बघितला तर झालेली चूक सहज लक्षात येईल, असे निम्हण यांनी म्हटलं आहे.

मुंबईतची पुनरावृत्ती पुण्यात नको

मेट्रो व्हायाडक्ट हे साधारणपणे Prestressed Segmental Structure असतात.आतमध्ये Post-tensioning Cables असतात. हे केबल्सच मुख्य भार उचलतात. म्हणून बाहेर दिसणाऱ्या काही दोषांमुळे लगेच स्ट्रक्चर कोसळेल असे नसते. पण फोटोवरून असे वाटते की जॉइंट नीट बंद झालेला नाही, बांधकामाची गुणवत्ता कमी दिसते. आणि त्यामुळे दीर्घकालीन टिकाऊपणावर परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारच्या चुकीमुळे मुंबईत एक अपघात झाला होता त्याची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये हि प्रामाणिक भावना आहे, असे निम्हण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कंत्राटदारांवर कारवाई करा

हा दोष नक्कीच कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेतृत्वाचा नाही तर प्रशासकीय ढिसाळपणाचा आणि बेजबाबदारपणाचा आहे. निदान उद्घाटन करण्यापूर्वी तरी त्याची शेवटची पाहणी करा पण ते ही नाही! यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई व्हायलाच हवी अन्यथा पुण्याला जागतिक नकाशावर नेण्याचं स्वप्नं स्वप्नच राहील हे नक्की! मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा प्रतिनिधी नक्कीच आहे परंतू त्याआधी पुणे शहराचा एक जागरूक नागरिक आणि अभियंता देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT