Pimpri News : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा ठाकरे शिवसेना,तर शिरुर शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार असल्याचा फॉर्म्यूला महाविकास आघाडीत जवळपास निश्चित झाला असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट मावळचे रणशिंग येत्या रविवारी (ता.21) आदित्य ठाकरेंची पिंपरीत सभा घेऊन फुंकणार आहे.
मावळचा खासदार हा शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा करीत त्यासाठीच हा आदित्य ठाकरेंचा दौरा आहे,असे पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. तर, शिरुरमध्येही आघाडीचा (शरद पवार राष्ट्रवादी)खासदार होईल,असे म्हणत त्यांनी आघाडीच्या या दोन जागावाटपावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तबच केले.
याशिवाय आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीही या दौऱ्याचा फायदा होणार असून पालिकेतही भगवा फडकणार आहे, अशी भविष्य़वाणी त्यांनी केली. भाजप आणि अजित पवार(Ajit Pawar) राष्ट्रवादीतून लवकरच काहीजण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घाटावरील मावळ, पिंपरी आणि चिंचवड या मावळ लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) रविवारी दौरा करणार आहेत. लोणावळा, तळेगावनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी शहर शिवसेनेने केली आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांची जाहीर सभा दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्यात ते भाजपचा बुरखा फाडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकत्याच दिलेल्या आमदार अपात्रता निकाल प्रकरणाची चिऱफाडही करणार आहेत,असे शिवसेनेचे पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबूकस्वार यांनी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या मावळ दौऱ्याने ही जागा आघाडीत ठाकरेंच्या वाट्याला जाणार हे जवळपास नक्की झाले आहे. तसेच त्यासाठी संभाव्य उमेदवार म्हणून गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतून (अजित पवार गट) ठाकरे गटात दाखल झालेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव घेतले जात आहे.
त्यामुळे ते ही सध्या पायाला भिंगरी लावल्यागत मावळ लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंचा हा दौरा आगामी लोकसभेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आदी यावेळी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.