PCMC NEWS : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसही (NCP) रविवारी (ता.२) दुभंगली. अजित पवार (Ajit Pawar) समर्थकांसह महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजितदादांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवड शहरामधील पक्षाच्या बहूतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा दादांकडेच आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटेंसारख्यांनी तसे जाहीरही केले आहे.
दरम्यान, उद्योगनगरीच नाही, सुनील शेळके आणि दिलीप मोहिते-पाटील हे आमदार दादांबरोबर गेलेल्या मावळ आणि खेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अवस्था काहीशी इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झालेली आहे. ते साहेब (शरद पवार) आणि दादा दोघांनाही मानतात. साहेब त्यांचे आदर्श असून दादांनी त्यांना पक्षात, सत्तेत पदे देत घडवले आहे. त्यामुळे एकनिष्ठता दाखविताना त्यांचे सॅंडविच होत आहे.
त्यातून काहींनी तूर्तास वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) अध्यक्ष अजित गव्हाणे त्यात आहेत. पक्ष पुन्हा एक होईल, अशी आशा त्यांना वाटते आहे. तसाच काहीसा सावध पवित्रा मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनीही घेतला आहे. मात्र, या दोघांचाही कल दादांकडे दिसून आला आहे. त्यातूनच खांडगे उद्या मुंबईला दादांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. शपथविधीनंतर दादांनी त्यांची व राष्ट्रवादीची भूमिका एकच असल्याने स्पष्ट केल्याने भेगडे, गव्हाणेंसारख्या इतर पदाधिकाऱ्यांनीही तूर्तास सबुरी बाळगत संयमी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
खेडचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर हे शरद पवारांच्या आजच्या कराड दौऱ्यात सामील झाले. मात्र, दादांबरोबर गेलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील हे जी भूमिका घेतील, त्याबरोबर राहू, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे दादांबरोबर राहणार असल्याचेच सूचित केले.
उद्योगनगरीतील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे दादांबरोबर असल्याने शहरातील बहूतांश राष्ट्रवादी पक्ष सुद्धा दादांबरोबरच जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कारण पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी अजितदादांची मुंबईत 'देवगिरी'वर कालच भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काटे यांनी आपण दादांबरोबर असल्याचे 'सरकारनामा'ला सांगितले.
भोईर आणि वाघेरे यांनी आपण पक्षाबरोबर असल्याची सावध भुमिका घेतली. भूमिका ठरवण्यासाठी दोन दिवस द्या, असे वाघेरे म्हणाले. तर, शरद पवारांचा फोटो आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या राजकीय भुकंपानंतर पुण्यात लगेच जाऊन साहेबांची भेट घेतली. त्यांनीही स्वभावानुसार संयमी धीराची भुमिका घेत पक्षासोबतच आहे, असे सांगितले.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत बहूतांशजणांना पदे ही अजितदादांनी दिली आहेत. पिंपरी महापालिकेत सत्तेत असताना अनेकांना दादांमुळेच पदाधिकारी होता आले आहे. त्यामुळे ते दादांच्या पाठीशी राहणार यात वादच नाही. फक्त पक्ष म्हणून दादांबरोबर जाण्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. त्यासाठी उद्या शहर कार्यकारिणीची बैठक घेऊन कल जाणून घेणार आहे, असे शहराध्यक्ष गव्हाणे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.