Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बंडखोरांना थोपवण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी त्यामध्ये यश आले असलं तरी पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित दादांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणार आहे.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत विजय शिवतारे हे तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुरंदरमध्ये सभा घेत विजय शिवतारे यांना 'यंदा बघतोस तू आमदार कसा होतो', असा इशारा दिला. त्यानंतर या निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता.
यामुळे गेले काही वर्ष विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय वैर पाहायला मिळाले. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये तह झाला आणि हे नेते एकत्र आले. मात्र, लोकसभेवेळी झालेला हा तह विधानसभा निवडणुकीत तुटला असल्याचा पाहायला मिळत आहे. महायुतीकडून विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना उमेदवारी दिली असताना या मतदारसंघातून अजित पवारांनी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सुनेत्रा पवार रिंगणात होत्या. त्यांच्या उमेदवारीला विरोध करत शिंदेंच्या शिवसेनेत असलेले विजय शिवतारे यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला होता. पवार कुटुंबाच्या विरोधात असलेली मते आपल्याला पडणार आणि आपण या निवडणुकीत विजयी होणार, असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला होता.
यामुळे अजित दादांची डोकेदुखी वाढणार असे दिसत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यात आली. त्यावेळी शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचे काम करणाऱ्या असल्याचे देखील सांगितले. प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची पिछेहाट झाली तर सुप्रिया सुळे यांना तब्बल 35 हजार मतांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले.
त्यामुळे आता हा तह मोडला का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे यांचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे असताना देखील या मतदारसंघातून अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तह होईल आणि अजित पवार आपला उमेदवार मागे घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, संभाजी झेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महायुतीतील एकमेव मैत्रीपूर्ण लढत ही पुरंदरमध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी झेंडेंना निवडून आणायचे आणि शिवतारेंना पाडायचं हे ठरवलं असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.