Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : '...तर मग तुरुंगातच टाकणार!'; अजित पवारांनी कुणाला भरला सज्जड दम?

Deepak Kulkarni

Pune News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणली आहे. या योजनेला दिवसेंदिवस महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या योजनेचा फायदा विधानसभेला उचलण्यासाठी महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे.

अजित पवार गटाने या योजनेची कॅम्पनिंग करताना मुख्यमंत्री हा शब्दच वगळला. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला. आता तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) तर या लाडकी बहीण योजनेवरुन थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणार्‍यांना चांगलाच दम भरला. ते म्हणाले, एका दाम्पत्याने लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा फायदा घेण्यासाठी तब्बल 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही सरकार म्हणून देतो पण जर कोणी अशी फसवणूक केली तर मग तुरुंगातही टाकतो.मग चक्की पिसिंग करा अशीही मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

अजित पवार म्हणाले,अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसोबतच 'लाडकी बहीण'चाही घेऊ फायदा घेऊ इच्छितात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल.सगळंच पाहिजे असेल, तर सरकारची तिजोरी खाली होईल.मग ब्रम्हदेव आला तरी काही शक्य होणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यावेळी बॅनरवरती खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. यावरही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, फ्लेक्सवर अमोल कोल्हेंचा फोटो आहे, ते स्थानिक खासदार आहेत. प्रोटोकॉल म्हणून त्यांचा फोटो लावला आहे. पण लगेच याची काय तर ब्रेकिंग न्यूज. अरे बाबांनो, जरा मागचा-पुढचा विचार करा. हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही, विविध विकासकामांचे लोकार्पण होतंय. मग तिथं प्रोटोकॉल पाळावा लागतो असं स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिलं.

आपल्या भाषणात अजितदादांनी अल्पसंख्याक समाजाविषयी तेढ निर्माण करणार्‍यांचाही चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले अन् आपण काय करत आहोत.समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी.सर्व-धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे अन् यापुढंही ती कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

अजित पवारांनी या कार्यक्रमात टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.ते म्हणाले, आपल्याला कोणाच्या बापाची भीती नाही, कोणाचं आपण घोडं मारलंय का? पण विनाकारण नको त्या बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते. जर मी ही एखाद्या ठिकाणी चुकून आक्षेपार्ह बोलत असेन मला मंचावरील इतरांना थांबवायला हवं. दादा, मला तुमचं बोलणं पटत नाही, असं म्हणून थांबवायला हवं. किंवा माझ्यासमोर कोणी चुकीचं बोलत असेल तर त्याला थांबवण्याची जबाबदारी माझी असणार आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT