ajit pawar
ajit pawar sarkarnama
पुणे

बंद पडलेल्या भीमा-पाटस कारखान्याबाबत अजितदादाचं मोठं विधान

सरकारनामा ब्युरो

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते व आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 'परराज्यातील लोकं इथं येऊन कारखाना चालवायला लागले तर कुणाला वाईट वाटत नाही. मात्र, राज्यातील कुणी चालवायला घेतला तर वाट्टेल त्या पध्दतीची स्टेटमेंट करतात' अशी टीका पवार यांनी केली. यावेळी अजितदादांनी भीमा पाटस कारखान्याबाबत महत्वाचे विधान केली.

अजित पवार (ajit pawar)म्हणाले, ''भीमा पाटस कारखाना (Bhima Patas sugar Factory)परराज्यातील मोठ्या कारखानदाराला चालवायला देण्याबाबत आमच्या बैठका चालू आहेत. कारखान्यावरील जिल्हा बँकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड ते करणार आहेत. त्यामुळे भीमा पाट्स कारखाना दुप्पट क्षमतेने सुरू होईल,'' कर्जाच्या ओझ्याखाली दबून बंद पडलेल्या 'भीमा-पाटस' कारखाना पुन्हा सुरू होण्याबाबतचे आशादायक विधान पवार यांनी केले.

''दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे भीमा पाटसवरील कर्जाची एकरकमी परतफेड संबंधित कारखानदार करत आहे. तो कर्नाटकात चार-पाच कारखान्यांवर रोज पासष्ट हजार टन ऊस गाळप करतोय. उद्या स्पर्धा असल्याने कारखाना दुप्पट होतोय. पण हेच आपल्यापैकी कुणी केले तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करतात,'' अशी खंत अजितदादांनी व्यक्त केली.

माढा तालुक्यात ज्वारी व्हायची तिथं बबनराव शिंदे यांनी यावर्षी वीस लाख टन गाळप केलंय. कारखाना टप्याटप्याने साडेबारा हजार टनांवर गेलाय, साखरवाडी कारखाना विस्तारतोय आणि भीमा-पाटसही संबंधित कारखानदार दुप्पट करणार आहे अशी उदाहरणेही त्यांनी दिली.

''वेगवेगळ्या पध्दतीची कारखानदारी काढली पाहिजे, वाडवडिलांनी लावलेलं रोपटं पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे असं पवारसाहेब सगळीकडे सांगत असतात. याच विचाराने आर्थिक सुबत्ता नांदावी, सगळ्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही काम करतो. पण काहीजण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या बातम्यां देऊन त्यामधून विपर्यास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,'' अशी टीका अजित पवार यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.

''शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अमकीकडे पैसे नेतात, तमकीकडे पैसे नेतात अशी काहीजण टीका करतात. तुम्ही माल तीस-पस्तीस वर्ष ओळखता. सगळ्यांना न्याय देण्याची माझी पध्दत असते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचाही राज्याच्या वेगवेगळ्या भागात निधी जावा असाच प्रयत्न असतो,'' असे पवार म्हणाले.

नीरा (ता. पुरंदर) येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरकडे जाते तर बारामतीतून तुकोबांची पालखी जाते. ज्ञानोबा-तुकोबांना जोडणारा हा मार्ग म्हणजेच नीरा-बारामती रस्ता रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत चारपदरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.

'कृषीपंप वीजबिल धोरण २०२०' मोहिमेअंतर्गत पन्नास टक्के वीजबिलमाफीची मुदत ३१ मार्चला संपली आहे. त्याची मुदत एक महिना वाढविण्याचा विचार करतो आहे. मात्र वापरलेल्या वीजेचे बील भरलेच पाहिजे अन्यथा वीजकंपनी कधीही अडचणीत येऊ शकते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT