Baramati : अजित पवारांनी रविवारी(दि.२ जुलै) राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे फडणवीस सरकारमध्ये विरोधी बाकावर बसलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादीतील काही आमदारांना आपल्यासोबत घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे. यानंतर दोन्ही बाजूंनी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचवेळी आता पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा 'चाणक्य' उल्लेख करत अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत.
एकीकडे राष्ट्रवादीतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर नाट्यमय सत्तांतरानंतर आता बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चाणक्याची उपमा देत अजित पवार(Ajit Pawar) यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. बारामतीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा झाली.
शहराच्या मध्यवर्ती भागात नगरपालिकेच्या समोरच हा बॅनर लागल्याने आज शहरात हा चर्चेचा विषय होता. एरवी राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या भाजप(BJP)च्या कार्यकर्त्यांनी बारामतीच्या आमदारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि या प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजाविणा-य देवेंद्र फडणवीस यांनाही चाणक्याची उपमा देत अभिनंदन करत भाजपनेच बाजी मारल्याचे दाखवून दिले आहे.
अजित पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक करत भाजप सोबतच आगामी निवडणुका लढविणार असल्याचे सूतोवाच केलेले होते. त्यामुळे भाजपनेही अजित पवार यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. बारामतीत लागलेल्या या बॅनरची सगळीकडेच त्यामुळे चर्चा झाली आहे.
अजित पवारांसह नऊ आमदारांनी भेटीसाठी पवारांकडे मागितला वेळ
राज्यातील राजकीय भूकंपानंतर बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे नेते अजित पवार यांच्यासह इतर नऊ बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, आता शरद पवार(Sharad Pawar) यांना भेटण्याची वेळ देणार की नाही याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या मंत्र्यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत वेळ मागितला आहे. मात्र, शरद पवार हे सोमवारी (दि.३) रात्री मुंबईत साडेआठच्या सुमारास येणार असल्याने त्यामुळे पवार आता यांना भेटण्याची उद्याला वेळ देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.