Ratnagiri News : जे होईल ते होईल. घर फोडले तर एक रुपया मिळणार नाही. ईडीच्या चौकशीची भीतीदेखील नाही. सत्तेसाठी लालसादेखील कधी केली नाही. अजितदादांसोबत असलेले संबंध आणि दिलेला शब्द. त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, यामुळे अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. काळजावर दगड ठेऊन हा निर्णय मी घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले. (I Will stand with Ajit Dada now: Shekhar Nikam)
शेखर निकम (Shekhar Nikam) म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कार्यालयातून शनिवारी रात्री ११ वाजता फोन आला आणि सर्व पक्षाच्या आमदारांना बोलवण्यात आले. बैठकीला सर्व नेतेमंडळी व आमदार उपस्थित होते. सुप्रिया सुळेही होत्या. दादा आणि ताई चर्चा करत होते. निर्णय झाला आम्ही सह्या केल्या. आता माघार घ्यायचा प्रश्नच उरला नाही.
राज्यात उलथापालथ झाल्यावर अजितदादांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी विधानभवनात आमदार शेखर निकमही उपस्थित होते. शरद पवारांना सोडून निकम वेगळी भूमिका घेतात की कसं, या बाबत रत्नागिरी जिल्ह्याला उत्सुकता लागून होती. यावर निकम यांनी सोमवारी सावर्डे येथे आपली ठाम भूमिका मांडली.
शेखर निकम म्हणाले की, अजितदादांनी मला अडचणीवेळी कायम मदत केली आहे. दादांनी यापूर्वी मला अनेकवेळा कॉल केले होते. पण मी गेलो नाही. पण यावेळी मी आपल्यासोबत (अजितदादा) राहीन, असा शब्द दिला होता. म्हणून मी मागे फिरलो नाही. आता परिणाम काय होतील ते होतील ही ठाम भूमिका घेत हा निर्णय घेतला.
खरंतर राजकारण सोडलेले बरे अशी माझी मानसिकता आहे. मोठ्या पदाधिकाऱ्यांसमोर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची अडचण होत आहे, अशावेळी आमच्यासारख्या लहान माणसाचे खूप हाल होतात. पण आता परिणामांची पर्वा नाही. निर्णय कोणताही घेतला तरी अडचण होते. चांगले वाईट परिणाम असणार मात्र यावेळी होईल ते होईल, अजितदादाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे निकम यांनी सांगितले.
बोलण्याचे धाडस झाले नाही
पवार कुटुंबीयांशी असणारे संबंध यामुळेच शरद पवार साहेबांची माफी मागायची आहे. त्याचा फोन आला होता; पण बोलण्याचे धाडस झाले नाही. त्यांच्या सहाय्यक सचिवाजवळ बोलणं झालं. रोहित पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं झालं. मी आपली भूमिका मांडली असली तरी मनापासून माफी मागायची आहे, असे निकम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.