Ajit Pawar and Sanjog Waghere Patil  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; कट्टर समर्थक संजोग वाघेरे शिवबंधन बांधणार

Ajit Pawar and Sanjog Waghere Patil : महायुतीला उद्योगनगरीत जोर का झटका... भाजपच्या एकनाथ पवारानंतर राष्ट्रवादीचे संजोग वाघेरेही ठाकरे शिवसेनेत जाणार

उत्तम कुटे

Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे-पाटील यांनी राजकीय आखाड्यात दादांना अस्मान दाखवले आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथले अजित पवारांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी सोमवारी (25 डिसेंबर) उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. त्यानंतर शनिवारी (30 डिसेंबर) 'मातोश्री'वर शिवबंधन बांधणार आहेत, अशी माहिती त्यांनी 'सरकारनामा'ला दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला त्यातही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना हा उद्योगनगरीत मोठा धक्का आहे. कारण वाघेरे हे त्यांचे कट्टर समर्थक असून पक्षाचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर आहेत. गेल्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी उषा या नगरसेविका होत्या. तर, मुलगा हा आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीत आहे.

हे दोघेही त्यांच्याबरोबर शिवसेनेत जाणार आहेत. त्यानंतर त्यांचे काही समर्थक शिवबंधन बांधतील, असा अंदाज आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबरला भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि पिंपरी महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दोन महिन्यांतच हा दुसरा धक्का युतीला शहरात बसला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीत मतभेद झाल्याने वा नाराज असल्याने पक्ष सोडत नसल्याचे वाघेरेंनी स्पष्ट केले. बऱ्याच दिवसांपासून हा विचार मनात घोळत होता, असे ते म्हणाले. सत्ताधारी भाजप वा शिंदे शिवसेनेत न जाता विरोधी पक्ष ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश का करीत आहात, अशी विचारणा केली असता, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून त्याचवेळी महिला सुरक्षा, शेतकरी, कामगारांचे प्रश्नही आ वासून उभे आहेत. ते सरकार सोडवत नसल्याने ते धसास लावण्यासाठी आणि ठाकरे यांचे विचार पटल्याने शिवसेनेत जात आहे, असे वाघेरे म्हणाले.

शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करण्यापूर्वी अजितदादांना सांगितले आहे का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. लोकसभेला मावळातून उमेदवारीच्या अटीवर प्रवेश करीत असल्याची बाबही त्यांनी फेटाळली. त्याचवेळी मी उमेदवारी मागितली असून ती ते मला देतील की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, असे मुत्सद्दीपणे ते म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT