Walchandnagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा ध्यास घेण्यात आला आहे. यासाठी व्यूहरचना आखण्यास भाजपने सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक पुढील काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेत आतापासूनच पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स, बँनर्स लावले जात आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची कन्या व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदार चे फ्लेक्स झळकले आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असल्याने अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा आता सुरु झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने यापूर्वीच अ फॉर अमेठी व बी फॉर बारामती अशी घोषणा करुन 2024 च्या लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मिशन बारामती सुरु करण्यात आले असून बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीतर्फे महादेव जानकर व 2019 च्या निवडणूकीमध्ये कांचन राहुल कुल (Kanchan Kul) यांनी निवडणूक लढवली होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणूकीची गणिते बदलली आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्याने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप व मित्र पक्षाची ताकद वाढणार आहे. सध्या अंकिता पाटील यांच्याकडे भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी स्वीकारून अंकिता यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच युवकांचे संघटन सुरु आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा जास्त प्रभाव आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान द्यायचे झाल्यास त्याच तोडीचा उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यामुळे अंकिता यांना ताकद देण्यास भाजपने सुरवात केली आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी यापूर्वी अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा केवळ दबक्या आवाजामध्ये सुरु होती. मात्र, आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी खासदार असे फ्लेक्स लावण्यात आले असून सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा पोस्ट तयार केलेल्या आहेत.
(Edited By - Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.