सोमेश्वरनगर : ``मला छत्रपती साखर कारखान्याला डायरेक्टर केलं. तेव्हा तर माझं लग्नसुध्दा झालं नव्हतं. लग्नाच्या वेळी लोकं विचारतात पोरगा काय करतो? आमचे घरचे म्हणाले, काय नाय आमचं पोरगं कारखान्याला डायरेक्टर आहे. मग आमच्या लग्नाला जरा सोपं गेलं. पद्मसिंह पाटलांनी मग म्हटलं, द्या त्याला आपली बहीण. कधी तरी चांगलं होईल...`` खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले लग्न ठरविण्याचे गुपित विजयादशमीच्या मुहूर्तावर सोमेश्वरच्या सभासदांसमोर उघड केले. पुढे मी शिकत गेलो. तसेच सोमेश्वर कारखान्यात निवडून दिलेल्या युवकांनीही शिकत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गव्हाणपूजन व गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. यावेळी कालच सोमेश्वरच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नव्या संचालक मंडळाचा व मावळत्या संचालक मंडळाचा एकत्रित सत्कार समारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचाही निवडणुकीच्या चोख नियोजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पवार म्हणाले, कारखान्याला अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, रणजित मोरे, प्रवीण कांबळे असे नवी कोरी पाटी असणारे काही संचालक दिले आहेत. त्यांनी ज्येष्ठांकडून शिकत राहिलं पाहिजे. मीही असाच शिकत शिकत गेलो. लग्नाच्या आधी डायरेक्टर झालो. आताच्या सगळ्या युवकांची लग्न झाली आहेत. पण त्यांच्या सासुरवाडीच्यांनाही वाटलं असेल हे राष्ट्रवादीचं काम करतात म्हणजे कधीतरी डायरेक्टर होतीलच म्हणून पोरगी देऊ. कधी कधी डायरेक्टर होणं असं फायद्याचं असतं, अशी मिश्किली त्यांनी केली.
पुढे म्हणाले, 'नंतर मला जिल्हा बँकेत डायरेक्टर म्हणून पाठवलं होतं. तेव्हा तर मला डायरेक्टर करताना अनंतराव थोपटे, नाना नवले, उध्दवराव भेगडे, मदन बाफणा, बापूसाहेब थिटे हे पाच जण म्हणाले ह्याला डायरेक्टर करा. पवारसाहेब म्हणाले, अहो ह्याला अजून त्यातलं काहीच कळत नाही. पण ह्या लोकांनी साहेब मुख्यमंत्री होते. म्हणून त्यांना खूष करण्यासाठी मला डायरेक्टर केलं.
मी पुढे बॅंकेचा चेअरमनही झालो. पुढे लगेचच तुमच्या सगळ्यांच्यामुळं खासदार झालो, राज्यमंत्री आणि पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. सांगायचा मतितार्थ असा की कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. सतत नवीन गोष्टी शिकता येतात. माळेगावचे नितीन सातव, योगेश जगताप असे चारपाच नव्या दमाचे तरूण डायरेक्टर सतत माझ्याकडे येत असतात. बाळासाहेब तावरेंचं पत्र घेऊन विविध परवान्यांसाठी पाठपुरावा करतात. तुम्ही देखील त्यापासून बोध घ्या. जुन्या लोकांकडून शिका. राज्यात जिथं चांगले प्रयोग चाललेत तिथं जाऊन ते चांगले का चाललेत ते पहा. आपल्या कारखान्याच्या विकासासाठी काय करता येईल ते करा, असा सल्ला त्यांनी दिला.
``आता निवडून आलेल्या सगळ्यांनी समाजातलं वागणं चांगलं ठेवा. उ्द टपणा नको. नम्रता हवी. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा उपयोग करा, असे आवाहनही पवार यांनी केले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रस्ताविक केले तर उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.