AjitPawar-ChandraraoTaware-RanjanTaware
AjitPawar-ChandraraoTaware-RanjanTaware Sarkarnama
पुणे

अण्णा-काकांची सत्ता असताना ‘माळेगाव’ची साखर गटारातून वाहत होती

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : माळेगाव कारखान्यावर चंद्ररावअण्णा आणि रंजनकाका तावरे यांची सत्ता होती, तेव्हा त्यांनी विस्तारवाढीचं ठरवलं आणि कुणाचंच ऐकलं नाही. निकृष्ट काम झालं, कारखान्यात अक्षरशः पिचकाऱ्या सुरू होत्या. साखर गटारातून वाहत होती. सत्ताबदल झाल्यावर तज्ज्ञांची मदत घेऊन आम्ही परिस्थिती सुधारली, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वरनगर येथे बोलताना सांगितले. (Ajit Pawar's criticism of Chandrarao Taware and Ranjan Taware)

सोमेश्वर सहकारी साखर काखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की माझ्या नेतृत्वाखालील कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी जाब विचारू शकतो. पण, माळेगावला अण्णा-काकांची सत्ता होती, तेव्हा त्यांनी विस्तारवाढ केली. निकृष्ट कामामुळे कारखान्यात अक्षरशः पिचकाऱ्या सुरू होत्या. साखर गटारातून वाहत होती. साखर उतारा सव्वा टक्क्यांनी घटला होता. सत्ताबदल झाल्यावर आम्ही परिस्थिती सुधारली. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार चुकला तर विकासावर परिणाम होतो. पण, कारखान्यात निवड चुकली तर थेट अर्थकारणाला फटका बसतो.

सहकार चळवळ पवारांना मोडीत काढायची आहे, हे धांदात खोटे आहे. सहकारमंत्र्यांसह अनेकांना घेऊन सहकारी कारखानदारीला प्रोत्साहन देतो. मंत्रिपरिषदेत सहकाराला कशी मदत करता येईल, अडचणीतून कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न करतो. आता इथेनॉल प्रकल्प उभारणीला हमी देण्याचा, भागभांडवल उभारायला मदत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आमचे चुकले तर पवारसाहेब जाब विचारतात, असेही पवार यांनी सांगितले.

विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहकारी कारखाने द्यायचे नाहीत असा निर्णय घेतला. त्यानंतरच्या सर्व सरकारांनी तो कायम ठेवला. राज्य सरकारच्या भागभांडवलाशिवाय ते उभे राहू शकत नव्हते. आता शेतकरी एकत्र येऊन खासगी कारखाने सुरू करतात. पण अनेक लोक आमच्यावरच सहकार चळवळ मोडीत काढतात, अशी साफ धादांत खोटी टिका करतात.

पंधरा दिवसांत उसाच्या बिलाची मागणी असते पण त्यापासूनच्या साखरेचे पैसे मिळायला वर्ष जाते. रोज शंभर किलोच्या पोत्यावर एक रूपया व्याज जातं. काही वेळा वर्षात ३६५ रूपये व्याज जातं. शेवटी ते शेतकऱ्यांच्या भावातूनच वजा होते. गुजरातमध्ये ऊस गेल्यावर पहिले पेमेंट घेते, दुसरे पेमेंट कारखाना बंद झाल्यावर आणि दिवाळीला तिसरे पेमेंट घेतात. आपल्याकडे मात्र कारखाना हंगाम सुरू होण्याआधीच तोडणी-वाहतुकीला कर्जाची उचल करतात. काही महाभाग मोलासेस, साखरेवर उचल घेतात. असे शंभर कारखाने आहेत. सभासदांनी हे विचारात घ्यावे, अशा शब्दांत अजित पवार यांनी एफआरपी तीन टप्प्यात देण्याच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे आपले मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT