भाजपचे नव्हे तर राष्ट्रवादी-शिवसेनेचेच १४ नगरसेवक फुटणार!

भाजपचा एकही नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार नाही
Yogesh Bhael-Namdev Dhake
Yogesh Bhael-Namdev DhakeSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यातील इलेक्टीव्ह मेरिट असलेल्यांना पक्षात घेतले जाईल, असे भाष्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच (ता. १७ सप्टेंबर) केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच दहा, तर शिवसेनेचे चार असे १४ नगरसेवक भाजपमध्ये येतील, असा प्रतिदावा भाजपने  सोमवारी (ता. २० सप्टेंबर) केला. त्यावर भाजपचे हे म्हणणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला. (No BJP corporator will join NCP: Namdev Dhake)

दरम्यान, महापालिका निवडणुक पुढे न जाता ठरल्या वेळेतच होणार आहेत, याचे संकेत मिळताच पिंपरीतील सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीत दावे, प्रतिदावे सुरु झाले आहेत.

Yogesh Bhael-Namdev Dhake
मला सगळं माहीत आहे; उमेदवारीसाठी मुंबईला कुणी येऊ नका : अजितदादांची तंबी

गेल्या शुक्रवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात आपण अनेक संधी देऊनही गत पालिका निवडणुकीच्या वेळी २०१७ मध्ये भाजपमध्ये गेलेले अनेक नगरसेवक  घरवापसीच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. भाजपचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी तो दावा आज खोडून काढला. आमचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार तर नाहीत. उलट त्यांचेच दहा नगरसेवक आणि शिवसेनेचे चार असे १४ जण भाजपमध्ये येत्या आठ दिवसांत येतील, असा प्रतिदावा त्यांनी केला.

Yogesh Bhael-Namdev Dhake
अजित पवारांची मोठी घोषणा : ‘माळेगाव’चा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून असेल!

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत काय होतंय ते पहा, असे श्रीक्षेत्र देहू (ता. हवेली, जि. पुणे) येथे नुकतेच सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासारखेच ढाकेही फेल जाणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटातून यावर तातडीने देण्यात आली. २०१२ ला फक्त तीन नगरसेवक असलेल्या भाजपने २०१७ ला ७७ पर्यंत मजल मारीत बहुमत गाठले, त्यामुळे २०२२ ला आम्ही शंभर प्लस असू आणि पुन्हा सत्ता आमचीच असेल, असा दुसरा दावाही ढाकेंनी या वेळी केला. त्यामुळे पालिकेत गटनेता नसलेल्या व गटबाजी असलेल्या शिवसेनेत मात्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या नऊमधील चार जणांनी जरी पक्षाला जय महाराष्ट्र केला, तर पालिकेवर भगवा फडकावण्याच्या त्यांचे नेते संजय राऊत यांच्या घोषणेचे काय होणार, शिवसेना शहरप्रमुख नऊ नगरसेवक तरी टिकवणार का अशी उपरोधिक, खमंग चर्चा ढाकेंच्या वक्तव्यानंतर ऐकायला मिळाली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी महापौर, माजी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी ढाके व त्यांच्या म्हणण्याची खिल्ली उडवली. ढाकेंचा दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असे ते म्हणाले. आगामी पालिका निवडणुकीची धुरा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे सांभाळणार आहेत. ते नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा संधी नाही मिळाली, तर भाजपमध्ये जाणार का, असे विचारले असता, ‘एकवेळ मी घरी बसेन. पण, भाजपमध्ये जाणार नाही,’असे बहल यांनी स्पष्ट केले. मी बाहेरचा असूनही पवारसाहेब आणि अजितदादांनी मला भरपूर दिले आहे, त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com