Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादांची 'बारामती'त मोर्चेबांधणी! म्हणाले, 'शब्द जपून देतो, पण...'

Baramati Loksabha Election 2024 : या जागेसाठी जोर लावला असून, सभांचा सपाटा सुरू केला आहे. इतकी वर्षे इतरांना संधी दिली आता मला संधी द्या, असे भावनिक आवाहन जाहीर सभांमध्ये करत आहेत.

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभेचा उमेदवार नक्की कोण असेल, याची अधिकृत घोषणा अद्याप कोणत्याही पक्षाने केलेली नाही. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढणार असून, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्या आहेत.

आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन पक्षाबाहेर पडणाऱ्या अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर सत्ताधारी पक्षात सहभागी होत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पद मिळविले. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याचा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला होता. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उमेदवार देत ही जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बारामतीच्या जागेसाठी अजितदादांनी जोर लावला असून, गेल्या काही दिवसांपासून या भागात सभांचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे. इतकी वर्षे इतरांना संधी दिली आता मला संधी द्या, असे भावनिक आवाहन जाहीर सभांमध्ये अजित पवार (Ajit Pawar) करत आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात अजित पवार यांनी पुरंदरकरांसाठी अनेक घोषणा केल्या.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना अजितदादा म्हणाले, 'एक तर मी शब्द फार जपून देतो, दिला तर पूर्ण करतो. माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तर गुंजवणे धरणात पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार' माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचेदेखील आपल्या भाषणात अजितदादांनी कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी यांना देशात अनेक बदल करायचे आहेत. आता सर्वांना घरे दिली जात आहेत. व्हिजन असलेला नेता असला की, देश पुढे जातो. केंद्राने 50 टक्के निधी पाण्यासाठी दिला. 50 टक्के राज्य सरकार देत आहेत. तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची बंधने नसतात. टँकर सुरू करण्यात आले आहेत. 220 कोटी रुपये इतका निधी पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतारे यांच्या बॅनरची चर्चा!

बारामती हे काय पवार कुटुंबीयांची जहागीरदारी नाही, असे म्हणत लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

लोकशाहीत कोणालाही कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना बोलावून दोन दिवस शांत बसण्याची विनंती केली होती. मात्र, असे असतानाही सासवड येथे झालेल्या अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणी शिवतारे यांचे बॅनर्स लागले होते.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT