Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : बारामतीत प्रचाराचा बार उडण्याआधीच अजित पवारांचा घसा बसला!

Baramati Lok Sabha Constituency : ही लढत जिंकण्यासाठी अजित पवारांना प्रचंड झटावे लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांना बारामतीतच घेरून त्यांच्या राजकारणाला लगाम घालण्याची सत्ताधारी भाजपचा डाव आहे. हा डाव जिंकण्यासाठी बारामतीची जागा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून पहिली चाल खेळली.

तेव्हाच, अजितदादांच्या(Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीत उतरविण्याचा डावही भाजप टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात शिवसेनेचे (शिंदे गट), माजी मंत्री विजय शिवतारेही आता बारामतीतून अपक्ष लढण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बारामतीतील प्रचाराला धार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीत सुळेंना हरवून सुनेत्रा पवारांना खासदार करण्याच्या तयारीला लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आताच आवाज बसला (घसा बसला) आहे. बारामतीत गुरुवारी दुपारी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांचा घसा बसल्याचे जाणवले. सत्तासंघर्षातून भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(Sharad Pawar) यांच्यातील संघर्ष टोकाला गेला.

राष्ट्रवादीचे नेते, अजित पवारांसह त्यांच्या पक्षातील 30-35 आमदारांना गळाला लावून, भाजपने त्यांना थेट सत्तेत घेतले. त्यानंतर पक्षीय लढाईतही अजित पवारांना बळ मिळाल्यानंतर शरद पवारांना धक्का बसल्याचा आनंद भाजपने मानला. त्यानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीतून लढवून, सुळेंचे राजकारण रोखण्याची व्यूहनीती भाजपने आखली आहे.

तर उमेदवारी गृहीत धरून सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष राहणार असतानाच, या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा पुकारा शिवतारेंनी केला आणि अजित पवारांविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील राजकारण तापले असून; सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांना बघून घेण्याची भाषा करीत आहेत.

त्यामुळे बारामतीत शिवसेना, राष्ट्रवादीतच संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सुळे, पवार यांच्यासह शिवतारेंचीही भर पडणार असल्याचे बारामतीतील प्रचार कुठल्या वळणावर जाईल, याचा नेम नाही. ही लढत जिंकण्यासाठी अजित पवारांना प्रचंड झटावे लागणार आहे. पुढच्या काही दिवसांत प्रचाराला वेग येईल. सभा, बैठकांमधून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मात्र, त्याआधीच अजित पवारांचा घसा बसल्याचे दिसून आले.

आपल्या वागण्याबरोबरच बोलण्यातून आणि भाषणातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही एक जरब बसवणारा अजित पवारांचा एक विशेष प्रकारचा आवाज आता, या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार, बैठका, दौरे अशा राजकीय रणधुमाळीत बसल्याचे गुरुवारी बारामतीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलताना स्पष्टपणे जाणवले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT