Police Commissioner Krishnaprakash Sarkarnama
पुणे

चिंचवडेंवर तातडीने गुन्हा पण कृष्णप्रकाशांची भाजप आमदाराच्या भाच्यावर मेहेरबानी!

पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यामुळे तणावातून ह्रदयविकाराचा झटका येऊन चिंचवडेचा बळी गेला असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी शनिवारी (ता.५) दिली.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : कोये (ता.खेड, जि.पुणे) येथील संशयास्पद चकमकीमुळे अगोदरच चर्चेच्या केद्रस्थानी आलेले पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) व पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस आता ते खोटे गुन्हे नोंदवित असल्याच्या आरोपावरून आरोपीच्या पिंजऱ्यात गेले आहे. कारण त्यांनी २५ जानेवारीला दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपचे (BJP) नेते व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे (Gajanan Chinchwade) यांचा शनिवारी (ता.५) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.

चिंचवडेंच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला होता असा आरोप भाजपचे केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यामुळे तणावातून ह्रदयविकाराचा झटका येऊन चिंचवडेचा बळी गेला असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी शनिवारी (ता.५) दिली. त्यावरून पोलिसांना आता चिंचवडेंच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून दुसरा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. नमूद करण्याजोगी बाब या गुन्ह्यातील आरोपी महिला हिच चिंचवडेविरुद्धच्या गुन्ह्यातील फिर्यादी आहे. दरम्यान, खोटा गुन्हा दाखल झाल्याने चिंचवडेंचा बळी गेला, या भाजपच्या आरोपाला या पोलिस कारवाईतून पुष्टी मिळाल्यासारखे आहे.

काल ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने गजानन चिंचवडेंचे आकस्मिक निधन झाले. ते, त्यांची पत्नी अश्विनी व इतर नातेवाईक यांच्याविरुद्ध त्यांच्या भावकीतील महिलेने २९ वर्षापूर्वीच्या जुन्या प्रकरणी फसवणुकीची तक्रार आता दिली होती. त्यावरून चिंचवड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा २५ जानेवारी रोजी दाखल केला. त्यामुळे चिंचवडे तणावात होते. त्यातूनच त्यांना काल ह्रदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांची पत्नी नाही, तर भाजपचे शहरातील नेते, पदाधिकारी यांनी कालच केला. तसेच चिंचवडेंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी यावेळी केली होती.

दरम्यान, चिंचवडेंच्या पत्नी अश्विनी यांनी त्याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कारण चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या चिंचवडेंनचा मृत्यू हा निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भेळ चौक, प्राधिकरण येथील फ्लॅटमध्ये झालेला आहे. त्यानुसार निगडी पोलिसांनी चिंचवडेंच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा काल (ता.५) नोंदवला. त्यात मयत चिंचवडेंविरुद्ध फिर्याद देणारी महिला व तिचे नातेवाईक असे नऊजण आरोपी आहेत. अद्याप कुणाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे तपासाधिकारी अमोल कोरडे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश ऊर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओंकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे व इतर तीन महिला असे या गुन्ह्यात आरोपी आहेत. शकुंतला यांनीच मयत चिंचवडे, त्यांची पत्नी नगरसेविका अश्विनी व इतरांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिलेली आहे.

शहर पोलिसांना अडचणीत आणणारा दुसरा संशयास्पद व तो खोटा असल्याचा आरोप झालेला गुन्हा हा सांगवी पोलिस ठाण्यावर नोंद झालेला आहे. तो ही पाच वर्षे जुना आहे. तसेच तो सुद्धा फसवणुकीचाच आहे. एकीकडे चिंचवड पोलिस ठाण्यावर २५ जानेवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात एकाही आरोपीला पोलिसांनी अद्यापर्यंत अटक केलेली नाही. मात्र, सांगवीच्या गुन्ह्यात मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण श्रीपती पवार (व. ४९, रा. पिंपळे गुरव) यांना तत्परतेने पोलिसांनी अटक केली. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. या गुन्ह्यातील फिर्यादी सचिन मोतीलाल कवडे (वयच ४३, रा. पिंपळे गुरव) हे स्थानिक भाजप आमदाराचे (चिंचवड) भाचे आहेत. त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी बोगस कागदपत्रांच्या हा खोटा गुन्हा नोंद केल्याचा आरोप अरुण पवारांचे बंधू बालाजी व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे. नमूद करण्याची बाब म्हणजे कवडे यांच्याविरुद्धच ते ब्लॅकमेल करून धमकावत असल्याबद्दल अरुण पवार यांनी स्थानिक सांगवी पोलिस ठाणे, एसीपी, डीसीपी ते थेट सीपी कृष्णप्रकाशांपर्यंत लेखी तक्रारी गेल्या वर्षभरात दिलेल्या आहेत. त्याची दखलच न घेतल्याने तीन आठवड्यांपूर्वी त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, अरुण पवारांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन लगेचच त्यात त्यांना अटक झाल्याने त्यांचे बंधू बालाजी व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी कोरोना आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याच दिवशी भेट घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. तसेच अरुण पवारांच्या तक्रारींची पोलिसांनी दखलच घेतली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर या बैठकीला उपस्थित असलेले पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याबाबत खातरजमा करून योग्य ती कारवाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामुळे चिंचवडेंप्रमाणेच आता अरुण पवार प्रकरणातही सांगवी पोलिस क्रॉस कंप्लेट घेण्याची शक्यता आहे. परिणामी सांगवी पोलिस ठाण्यावरील ४ तारखेच्या गुन्ह्यातील फिर्यादी हे दुसऱ्या त्यांच्या नव्या गुन्ह्यात चिंचवड पोलिस ठाण्यावरील चिंचवडे प्रकरणाप्रमाणे आरोपी झाले, तर आश्चर्य वाटायला नको.

शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेणारा व त्यांच्यावर आरोप झालेला तिसरा गुन्हा हा शहरातील पिंपरी पोलिस ठाण्यावर याच महिन्यात नुकताच (ता.२) दाखल झालेला आहे. योगायोगाने तो ही फसवणुकीसह खंडणीचा आहे. त्यात भाजपचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक केशव घोळवे व इतर चौघांना अटक करण्यात आली आहे. हा गुन्हाही खोटा असून त्यात घोळवेंना अडकावल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यातील आरोपी ८ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. चिंचवडेंसाठी आंदोलन करणारे भाजप महापौर व सभागृहनेत्यांनी घोळवेंसाठीही पोलिस ठाण्याबाहेर २ तारखेला ते केले होते.

तसेच या गुन्ह्यातील खऱ्या आरोपीविरुद्ध (राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक) गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची लेखी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, त्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, आलेल्या तक्रारीवर तिची शहानिशाही न करता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तर ते समजू शकते. पण, त्यात लगेच अटकेची गरज नसताना व सात वर्षापर्यंत शिक्षा होणाऱ्या गुन्ह्यांत ती करणे बंधनकारक नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असूनही काही गुन्ह्यांत पोलिस ती करतात. त्यातून त्यांच्या या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जातो. आरोप केले जातात. पोलिसांविषयी संशय निर्माण होतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT