Shivsena-BJP Politics News: छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडीच्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाच्या कल्याण गायकवाड यांची गचांडी धरली होती. पक्षाचे तीन सदस्य त्यांनी गायब केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या निवडणुकीत कल्याण गायकवाड हेच सभापतीही झाले. मात्र या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.
गेल्या चार-पाच दिवसापासून अंबादास दानवे यांना फोन करून कापून टाकू, फाडून टाकू अशी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा आणि तशी तक्रार पोलीसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. दानवे यांना धमकी देणारा हा भाजपाचा कार्यकर्ता असून तो पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड यांचा समर्थक असल्याचे आता समोर आले आहे.
सभापती पदाच्या निवडीच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात अंबादास दानवे यांनी भाजपाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर धरली होती. तसेच आमचे सदस्य कुठे लपवून ठेवले असा जाब विचारत कानशिलात लावल्याचेही बोलले जाते. या घटनेचा राग मनात धरून गायकवाड यांच्या समर्थकानेच अंबादास दानवे यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. तर सभापती कल्याण गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार चुकीचा आहे. धमकी देणारा माझा समर्थक असला तरी त्याच्या कृतीचे मी समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले.
भाजपचा कार्यकर्ता असलेल्या या व्यक्तीने सभापती कल्याण गायकवाड यांची कॉलर का पकडली? याचा जाब विचारण्यासाठी फोन केला होता, अशी माहिती अंबादास दानवे यांनीच दिल्याचे समजते. कल्याण गायकवाड यांनी मात्र मला याविषयी काहीच माहित नाही, परंतु अशा प्रकारे धमकी देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान, आपल्याला पाच ते सहा वेळा धमक्यांचे फोन आल्याचे दानवे यांनी माध्यमांना सांगीतले.
अंबादास दानवे यांनी या संदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या धमकी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर आज दानवे यांचे स्वीय सहायक गणेश म्हस्के यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता धमकी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून भाजपाचा कार्यकर्ता आणि पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड यांचा समर्थक असल्याचे समोर आले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.