Amit Shah sarkarnama
पुणे

Amit Shah Pune Visit : अमित शहांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादीला प्राधान्य; मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनचे उद्‍घाटन मात्र दौऱ्यातून वगळले

Amit Shah Pune tour political schedule : अमित शहांच्या पुणे दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दौऱ्यात राष्ट्रवादीला प्राधान्य देण्यात आले असून मुरलीधर मोहोळ यांच्या मॅरेथॉनचे उद्‍घाटन वगळण्यात आले. जाणून घ्या सविस्तर बातमी.

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दौऱ्यात भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी अमित शहा उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांच्या दौऱ्यातून हा कार्यक्रम वगळण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

अमित शाह 15 आणि 16 तारखेला दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या दौऱ्यात पुणे शहरातील त्यांचा कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला नाही. मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनाला शहा उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी शहरात जाहिरातबाजी आणि होर्डिंगही लावण्यात आले होते. मात्र, शाह रविवारी दुपारी पुण्यात दाखल होणार असल्याने मॅरेथॉनच्या उद्घाटनाला त्यांची उपस्थिती असणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. खासदार पार्थ पवार यांनी 13 तारखेला जिल्हा परिषदेत जाऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

विशेष म्हणजे, रविवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत अमित शाह यांचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम निश्चित नाही. या कालावधीत महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘‘पुणे शहरात अमित शाह यांचा एकही मोठा कार्यक्रम नाही. त्यामुळे भाजपतर्फे तळेगाव येथील कार्यक्रमासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन सुरू आहे.’’

त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीला मिळणारे प्राधान्य आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या संभाव्य राजकीय भेटींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT