Amit Shah Pune visit: केंद्रीय मंत्री अमित शाह १८ आणि १९ फेब्रुवारी पुणे दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यादरम्यान १९ फेब्रुवारीला शाह शिवनेरी किल्ल्यावर भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शाह यांच्या पुणे भेटीची शहर भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहेे.शाह यांच्या हस्ते पुण्यातील आंबेगाव येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचं प्रकाशन शाह यांच्या हस्ते होणार आहे.
१८ फेब्रुवारीला सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शाह यांचा पुण्यात मुक्काम आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर शाह शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर शाह कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर शाह यांची सासुरवाडी असून दोन दिवसात विविधि सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा पुणे दौरा होत असला तरी त्याचा निवडणुकांशी नाही. शाह यांचा हा दौरा पूर्वनियोजित आहे. तीन महिन्यांपूर्वीच शाह यांचा दौरा ठरला होता. मात्र, काही कारणाने त्यावेळी दौरा स्थगित करण्यात आला होता.निवडणुकीच्या काळात शाह येत असले तरी निवडणुकीशी संबंधित काहीही कार्यक्रम होणार नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीशी संबंधित कोणताही कार्यक्रम नसला तरी शाह यांच्या या दौऱ्याचा उपयोग कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीला भाजपाला होणार आहे. शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहर भाजपाकडून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.त्याची जय्यत तयारी सुरू आहे. कोणताही जाहीर कार्यक्रम नसला तरी निवडणुकीच्या संदर्भाने शाह यांच्या उपस्थितीत बैठका होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच काळात शाह पुण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे राज्यातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.