Pune News : पुणे शहरात नुकतेच आलेले नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कामाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी काल शुक्रवारी 'सकाळ' कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. न्यूजरुममध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नांवर त्यांनी आपले भविष्यातील योजना सांगितल्या. पुण्यात गुन्हेगारी, अवैध धंद्यांना आळा, महिला सुरक्षा, वाहतूक कोंडीतून मुक्ती, सायबर सुरक्षा, अमलीपदार्थमुक्त पुणे, दहशतवाद रोखणे अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (Latest Marathi News)
पुणे शहराचा कार्यभार घेतल्यावर आपला भर हा ‘बेसिक पोलिसिंग’च्या अतंर्गत गुन्हेगारी रोखणे आणि गुन्ह्याचा तपास यावर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. आपला प्राधान्य अवैध धंदे आणि संघटित गुन्हेगारी, टोळीगुन्हे यांना रोखणे असणार आहे. सामान्य नागरिकांना, महिलांना-मुलींना सुरक्षित वातावरण राखले पाहिजे. तसेच तरुणांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खरंतर चुकीच्या आणि अवैध धंद्यांच्या मिळणाऱ्या पैशातून गुन्हेगारी वाढत जाते. त्यामुळे संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यावर आपला भर राहणार आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक स्वरुपाची कारवाई वाढवले जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. परंतु कोणाला डॉन बनायचे असेल तर त्याला जमिनीवर आणले जाईल.
गुन्हेगारांना कायद्याचा वचक वाटलं पाहिजे. त्यामुळे वेळोवेळी गुन्हेगारांची परेड करण्यात येणार आहे. त्यांचा पाणउतारा केला जाईल. संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे डॉन, माफिया, अमली पदार्थ स्मगलर, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
रस्त्यावर फिरताना नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिला-मुलींच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर प्रत्येकाला न्याय मिळेल, असं नागरिकांना वाटलं पाहिजे. शाळा महाविद्यालय परिसरात दामिनी पथकांची नियमित गस्त सुरु राहणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा सेल, ‘बडीकॉप’सह अन्य योजनांचा आढावा घेऊन त्या राबविण्यात येतील. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य असेल. (Latest-Marathi-News)
शाळा-महाविद्यालय परिसरात शंभर मीटरमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी आहे. शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाशी बोलून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मटका, जुगार, क्लब, हुक्का पार्लर, बेकायदेशीर दारू विक्री अशा अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. पब, हॉटेल्स, बार रात्री दीड वाजता ‘बंद म्हणजे बंद’! अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून, पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्याचा प्रयत्न राहील.
पुणे शहरातील (Pune) सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरच्या सहकार्याने अधिकाधिक जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न असेल. महिला सुरक्षा, वाहतूक, सायबर, ड्रगमुक्त पुणे याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद वाढविण्याचा प्रयत्न राहील.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्याचा वापर म्हणजे गुन्हेगारांवर शेवटची शस्त्रक्रिया असते. गुन्हेगारांना ‘मोका’ कायद्याचा धाक राहिला पाहिजे, परंतु ‘मोका’च्या गुन्ह्यात जामीन मिळणे ही चिंतेची बाब आहे. याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई झाली आहे.त्याचे परिणाम दिसून येण्यासाठी थोडा वेळ लागेल. मी २८ वर्षांपासून महाराष्ट्रात पोलिस दलात कार्यरत आहे. येथे कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता गुन्हेगारांना वाचविण्यासाठी दबाव टाकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. सर्वांसाठी कायदा समान आहे.
सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून त्यांच्या क्षमता विकसित करण्यात येतील, तसेच सायबर क्षेत्रातील खासगी तज्ज्ञांची मदत घेणार आहोत. याशिवाय पोलिस दलातील कॉन्स्टेबल हा आमचा कणा आहे. त्यांच्या वेल्फेअरसाठीच्या सर्व योजना ताकदीने राबविण्यात येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.