माजी मंत्री, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचे संकेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाईचे संचालक प्रवीण माने, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचा हिरमोड झाला आहे.
नाराज असलेल्या जगदाळे, माने आणि शहा यांनी इंदापुरात आज ( 11 ऑक्टोबर ) ‘परिवर्तन मेळावा’ घेतला. यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत.
शरद पवार ( Sharad Pawar ) आणि सुप्रिया सुळे यांचं इंदापूर तालुक्यात प्रेम असेल, तर निर्णय बदलावा लागेल. अन्यथा इंदापूरची बंडखोरी परडवणार नाही, असा इशारा आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे. यावेळी जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकेचे अस्त्र सोडले आहेत.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 26 हजारांचं मताधिक्य दिलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं इंदापूर तालुक्यावर प्रेम असेल, तर उद्याचा निर्णय बदलावा लागेल. या माणसापाशी ( हर्षवर्धन पाटील ) काय जडलं आहे?”
“कुणीतरी म्हटलं, त्यांनी ( हर्षवर्धन पाटील ) महाराष्ट्रात 20 वर्षे विकासाचं काम केलं. पण, आधी आपल्या तालुक्याचं बघा. तुम्ही पाप केलं आहे. याची परतफेड येथेच करावी लागणार आहे,” अशी टीका आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता केली.
यावेळी हा उमेदवार बदलायचा का नाही? असा सवाल आप्पासाहेब जगदाळे यांनी जनतेला विचारला. तेव्हा, “हो..” असं एकमतानं उत्तर आलं.
“ही गोष्ट इंदापूरपुरती नाही. येथील मोहोळ महाराष्ट्रभर उठणार आहे. इंदापूरची बंडखोरी परवडणार नाही,” असा इशारा आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
“शरद पवार, सुप्रिया सुळे आमचे काल, आज आणि उद्याही दैवत राहतील. मी त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आम्ही सर्वजण बसून हा निर्णय घेऊ,” असं आप्पासाहेब जगदाळे यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.