माजी आमदार प्रशांत परिचारक हे भाजपत अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. याला कारण आहे, प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्यातील सुरू असलेला संघर्ष. प्रशांत परिचारक हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहेत. समाधान आवताडे यांना पुन्हा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक 'तुतारी’ हाती घेण्याच्या चर्चांना उधाण आलं. यातच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून परिचारकांना तिकीट दिलं, तर काय निकाल लागेल, याची माहिती गोळा करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं ( शरदचंद्र पवार ) मंगळवारी ( 11 ऑक्टोबर ) विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती घेतल्या. यासाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून डझनभर इच्छुक नेते गेले होते. त्यात स्वर्गीय भारतनाना भालके यांचे सुपुत्र विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके ( Bhagirath Bhalke ), भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
परंतु, पक्षश्रेष्ठींचे लक्ष प्रशांत परिचारक ( Prashant Paricharak ) यांच्याकडे भूमिकेकडे असल्याचं सांगितलं जातं. पक्षश्रेष्ठींनी मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर-मंगळवेढ्यात फोन करून परिचारकांच्या हाती 'तुतारी’ दिली, तर काय निकाल लागेल, याचा कानोसा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक यांना ‘तुतारी’देण्याबाबत पंढरपुरात सर्वेक्षण सुरू असल्याच्या कुजबुजीचं आता उघड चर्चेत रूपांतर होत आहे.
मंगळवेढ्यातील मेळाव्यात दांडी...
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्यात काही अलबेल नाही. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याचे स्पष्ट संकेत परिचारक यांनी दिले आहेत. परिचारक यांच्याकडून घोंगडी बैठकाही घेतल्या जात आहेत. सोमवारी ( 7 ऑक्टोबर ) मंगळवेढ्यातील आंधळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध उद्घाटनाचा कार्यक्रम आवताडेंनी घेतला. या कार्यक्रमाला आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. मात्र, या कार्यक्रमाला परिचारक यांनी गैरहजेरी लावून राजकीय चर्चेला आणखी खतपाणी घातले.
'तुतारी' घेणार?
एकीकडे परिचारकांनी घोंगडी बैठकांना सुरूवात केली आहे. मात्र, परिचारक कोणत्या पक्षाकडून लढणार? हे अद्याप ठरलं नाही. पण, परिचारक हे ‘तुतारी’ हाती घेणार का? हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.