Ajit Gavhane, Mahesh Ladange
Ajit Gavhane, Mahesh Ladange sarkarnama
पुणे

गव्हाणेंच्या नियुक्तीतून राष्ट्रवादीने केली आमदार लांडगेंची 'नाकाबंदी'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठा फेरबदल केला. शहराध्यक्ष, महिला शहराध्यक्ष, युवक शहराध्यक्ष बदलले. ही तिन्ही पदे शहरातील भोसरी मतदारसंघात देण्यात आली. त्याजोडीने युवकचे कार्याध्यक्षपदी भोसरीत दिले गेले. याव्दारे भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Ladange) यांची 'नाकाबंदी' करण्याचा पूरेपूर प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. परिणामी, लांडगेंना आगामी काळात म्हणजे येत्या पालिका निवडणुकीतच मोठा संघर्ष करावा लागून आपली क्षमता आणि नेतृत्व कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट, युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी युवक भोसरीच्या कार्याध्यक्षपदी राहुल भासले, अशी चारही पदे भोसरी मतदारसंघात देण्यात आली आहेत. दुसरीकडे, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना, मात्र राष्ट्रवादीच्या नव्या खांदेपालटात 'सॉफ्टकॉर्नर' मिळाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादीने प्रशांत शितोळे यांची पुन:नियुक्ती केली असून युवक कार्याध्यक्षपदी प्रसन्न डांगे आणि महिला कार्याध्यक्षपदी उज्ज्वला ढोरे यांची निवड केली आहे.

पिंपरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकूण ४६ प्रभागांपैकी १९ प्रभाग चिंचवडचे भाजप आमदार यांच्या मतदारसंघात मोडतात. त्यामुळे तेथील ५७ नगरसेवकांचे भवितव्य या मतदारसंघातील भाजपच्या पक्षसंघटनेवर अवलंबून राहणार आहे. भोसरी आणि चिंचवडची तुलना पाहता भोसरीत राष्ट्रवादीने प्रभावी चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. गव्हाणेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे भोसरीतील संभाव्य उमेदवार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'गुड बुक'मधीलही आहेत. मराठा समाजाचा चेहरा असल्याने लांडगेंचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.

'भोसरी' त माळी समाजाचा मोठा प्रभाव चांगला आहे. त्यामुळे महिला शहराध्यक्षपदी माळी समाजाच्या कविता आल्हाट यांना जबाबदारी दिली आहे. तर, नेहरुनगर आणि परिसरात प्रभाव असलेले वडार समाजातील नगरसेवक राहुल भोसले यांना कार्याध्यक्षपदी संधी देत भोसरी मतदारसंघातील जातीय त्रिकोण साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी केलेला आहे. शहराच्या अध्यक्षांसह प्रमुख सेलचे सात पदाधिकारी हे मराठा असल्याची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे पक्षाच्या शहरातील काही जुन्या जाणत्या नेत्यांनी केली होती. त्याची दखल नव्या बदलात घेतल्याचे जाणवते. इम्रान शेख या तरुणाला युवक अध्यक्ष म्हणून संधी देत आता अल्पसंख्याक समजालाही प्रमुख पदाधिकारी म्हणून शहर कार्यकारिणीत स्थान दिले गेले आहे.

भोसरीला झुकते माप देताना दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात जगतापांना थेट आव्हान देणारे कलाटे, काटे, चिंचवडे, वाघेरे, जगताप आदींना मात्र नव्या कार्यकारिणीत राष्ट्रवादीने बाजूला ठेवले आहे. कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळेंना पुन्हा संधी दिली आहे. वास्तविक, ते जगतापांचे पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक आहेत. कार्याध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी भाजपवर टीकेचा भडीमार केला. पण, एखादा दुसरा अपवाद वगळता जगताप यांच्यावर थेट टिका करण्याचे त्यांनी टाळले. २०१९ मध्ये जगताप यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी निवडणुकीत चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार दिला नाही. अशा परिस्थितीत बदल करताना जगतापांना आव्हान देईल, अशा नव्या चेहऱ्यांना संधी देणे अपेक्षित पण, तसे झालेले नाही.

राष्ट्रवादीच्या नव्या बदलात पक्षाचा आमदार (अण्णा बनसोडे) असलेल्या पिंपरी मतदारसंघाकडेही काहीसा कानाडोळा केलेला आहे. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवडल या दोन मतदारसंघातील सुमारे ८३ नगरसेवकांच्या जागांवर भाजपला पुन्हा वर्चस्वाची काहीशी संधी आहे. त्याचवेळी भोसरीत टाकलेले वजन पाहता तेथील भाजपच्या नगरसेवकांची संख्या २५ ते २७ पर्यंत कमी होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज या बदलावर आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात जगताप यांनी जातीने लक्ष घातले आहे. तेथील निकालावर शहरातील सत्तेचे गणित निश्चित होणार आहे. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील सत्तेच्या राजकारणात चिंचवडचे जगताप 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले असल्याचा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT