Pune News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोर हे निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. पक्षाला विनंती करून देखील उमेदवारी न मिळाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांनी मोठ्या अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने हे बंड थंड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावण्याचे पाहायला मिळत आहे.मात्र, पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी अद्याप कोणतेच प्रयत्न झाले नसल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे भाजप आणि महायुतीने शहरातील नेत्यांचे बंड उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मिटवला असताना दुसरीकडून मात्र महाविकास आघाडीचे बहुतांश बंडखोर आपल्याला बंडखोरी रोखण्यासाठी कोणताच संपर्क झाला नसल्याचे सांगत आहेत.
महाराष्ट्र प्रभारी असलेले काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी मुंबई येथील वॉर रूम मध्ये बसून राज्यभरातील 36 बंडखोरांना फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील बंडखोरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बंडखोरांना फोन करून तुमची निवडणूक जिंकण्यासाठी गरज असून तुम्हाला राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. या 36 बंडखोरांमध्ये मात्र पुण्यातील काँग्रेसच्या एकाही बंडखोराचा समावेश नसल्याचे पाहायला मिळत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. असून काँग्रेस भवनापासून त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. सोबतच कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांनी अपक्ष म्हणून आपल्या मतदारसंघातून दंड थोपटले आहेत.
या बंडखोरांना थंड करणे हे काँग्रेसचे मोठे आव्हान असताना अद्याप यापैकी कोणालाही काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरून अथवा शहर पातळीवरून संपर्क झाला नसल्याचे पुढे आले आहे. 'सरकारनामा'शी बोलताना आबा बागुल, महेश आनंद आणि कमल व्यवहारे यांनी आपल्याला अद्याप तरी काँग्रेसच्या अथवा महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी संपर्क केला नसून अर्ज माघारी घेण्याची विनंती देखील केली सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेसला शहरातील झालेली बंडखोरी रोखण्यात कोणताही इंटरेस्ट नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपण आज सर्व काँग्रेस बंडखोरांच्या घरी जाऊन व्यक्तिगत चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
(Edited By Roshan More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.